Breaking News

काँग्रेसकडून मल्लिकार्जून खरगे करणार ‘वंचित’ची मनधरणी

नवी दिल्ली
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँगे्रसने वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्याची तयारी चालवली आहे. लोकसभेतील दारूण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेसने ताठर भूमिका न घेता वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यावेळी या चर्चेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रभारी मल्लिकार्जून खरगे पुढाकार घेणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हरियाणातील काँगे्रस नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर राहुल गांधींनी महाराष्ट्रातील नेत्यांसोबत संवाद साधला. संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जून खरगे, यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, रजनी पाटील, हुसेन दलवाई आदी 30 नेते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीसोबत आघाडीचे निश्‍चित झाले असून वंचितसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. रविवारी नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. विधानसभेतील रणनितीवर यामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीला झालेल्या मतविभाजनामुळे काँग्रेसच्या लोकसभेच्या 9 जागा पडल्याचेही चर्चेत आले. यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांसोबत येत्या 6 जुलै रोजी बैठक घेण्यात येणार असून चर्चा आणि आघाडीची जबाबदारी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आली असल्याचे ठाकरे म्हणाले. तसेच अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून बोलणे संपले आहे. आता जागावाटपावर शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सांगितले. लोकसभेच्या दारूण पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व्यथीत झाले आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही एकाही काँग्रेसच्या नेत्याने जबाबदारी न स्वीकारल्याने ते नाराज झाले होते. ही खंत व्यक्त केल्यानंतर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे पाठविले आहेत. यामध्ये अशोक चव्हाण यांचेही नाव आहे. दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्याची तयारी चालवली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर विधानसभेची पूर्वतयारी करीत असताना प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून वंचित आघाडीसाठी जागा सोडण्याची तयारी काँगे्रसने दर्शविली आहे. मात्र काँगे्रस वंचितसाठी किती जागा सोडणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही खुलेपणाने चर्चा झाली. भविष्यातही राष्ट्रवादीबरोबरची आघाडी कायम राहील. या विषयावर लवकरच राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करण्यात येईल. वंचित आघाडीबाबत ते म्हणाले, वंचितसमवेतही आघाडी करण्याबाबत आम्ही मार्ग मोकळा ठेवला आहे. आमच्या प्रस्तावाबाबत ते काय निर्णय घेतात, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.‘वंचित’चा काँगे्रसला अल्टिमेट
काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचे असेल तर त्याचा निर्णय 20 जुलैपर्यंत घेण्यात यावा; अन्यथा वंचित बहुजन आघाडी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल, असा अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आल्यानंतर काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी काँगे्रस सक्रिय झाली आहे. वंचित आघाडीकडून अल्टिमेटम मिळताच काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. याबाबत बोलताना, लक्ष्मण माने म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात फारच वाईट कामगिरी केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला मजबूत करण्यासाठी काँग्रेससमोर वंचित आघाडी शिवाय दुसरा पर्याय नाही. जर आघाडी झाली तर आम्ही नक्कीच त्यांना साथ देऊ, आम्ही भाजपचे कधीही समर्थन करणार नाही. असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.