Breaking News

धनंजय मुंडे यांच्या विरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन

बीड / प्रतिनिधी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे.
मुंडे यांनी पूस गावातील शेतकर्‍यांना प्रलोभन दाखवून जमीन व्यवहारात फसवणूक केली, असा आरोप करत मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचे सहकुटुंब धरणे आंदोलन सुरू आहे. मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने पूस जमीन प्रकरणातच काही दिवसांपूर्वी मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्याालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने 14 जून रोजी स्थगिती दिली. त्याचबरोबर मुंडे यांच्यावर दाखल केलेल्या बर्दापूर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती देण्यात आली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे नियोजित जगमित्र शुगर मिलसाठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी मुंडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. ही जमीन देवस्थानची असल्याचा दावा वादीतर्फे करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या ठिकाणी या प्रकरणावर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली, तरी पोलिसांनी बर्दापूर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली.