Breaking News

पाणी वाचवा, राष्ट्र वाचवा

मोदी यांची जलसंकटाबाबतचे नवे अभियान

नवीदिल्लीः
पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा. पाणी वाचविले, तर राष्ट्र वाचेल, असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसंकटावर जनजागरण अभियान हाती घेण्याची सूचना केली.
दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी रुजू झाल्यानंतर मोदी यांनी आकाशवाणीवरून जनतेशी मन की बात’केली. ‘देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली,’ अशा शब्दांत भावना व्यक्त करत त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेचे आभार मानले. या वेळी त्यांनी जल संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सध्या देशाचा बहुतांश भाग जलसंकटाचा सामना करत असल्याने सर्वांनी जल संरक्षण करण्याची गरज असल्याचे आवाहन मोदी यांनी केले. पाण्याचा प्रश्‍न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. असे ते म्हणाले.

लोकांचा सहभाग आणि साह्याच्या मदतीने जलसंकटावर मात करू, असा विश्‍वास व्यक्त करून ‘जन, जन जुडेगा जल बचेगा’ असा संदेश त्यांनी दिला. देशात केवळ 8 टक्के पाणी वाचवले जाते, पाण्याची समस्या जाणून त्यावर विचार करण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे असे आवाहन केले. पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीने घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 22 जूनला देशातील हजारो ग्रामपंचायतींनी जल संरक्षणाचा संकल्प केल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी झारखंडच्या हजारी बागमधील एका सरपंचाचा संदेशदेखील ऐकवला.

पंतप्रधानांचे तीन सल्ले
* ज्याप्रकारे देशवासीयांनी स्वच्छता अभियानाला जनआंदोलनाचे रुप दिले, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठी जन आंदोलनाची सुरुवात करायला हवी.
* देशात पाण्याच्या संरक्षणासाठी अनेक पारंपरिक पद्धतींचा वापर गेल्या अनेक काळापासून होत आहे. जलसंरक्षणाच्या या पारंपारिक पद्धती नागरिकांनी एकमेकांपर्यंत पोहोचवायला हव्यात.
* जल संरक्षणाचे काम करणार्‍या एखाद्या व्यक्ती किंवा संघटनेला जर तुम्ही ओळखत असाल, तर नागरिकांना याबाबत माहिती द्यावी.