Breaking News

नवी मुंबई शहरात साठवण तलाव दुर्लक्षित!

नवी मुंबई
पावसाला सुरुवात झाल्यापासून नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. गेल्या अनेक वर्षांत अशा पद्धतीने पाणी साचले नव्हते. मात्र या वर्षी अगदी थोड्या पावसातही शहरात अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले. नवी मुंबई शहर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वसविले आहे. शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि खाडीतील भरतीचे पाणी शहरात येऊ नये म्हणून शहर वसवतानाच साठवण तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे पाण्याचे योग्य नियंत्रण केले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या धारण तलावांची सफाईच झालेली नाही. त्यामुळे तलावांची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली असून पाण्याच्या योग्य निचरा होण्याऐवजी पाणी शहरात साचू लागले आहे.
मुंबईची वाढती गर्दी लक्षात घेता सरकारने जुळी मुंबई तयार करण्यासाठी ठाणे-बेलापूर पट्ट्यातील तीस गावांचा विचार केला. मात्र जुळी मुंबईच्या ऐवजी नवी मुंबईची उभारणी करण्यास घेतली. हा सर्व भूभाग समुद्रापासून खाली असल्याने भरतीच्या वेळी भरतीचे पाणी शहरात येण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे भरतीचे हे पाणी शहरात येण्यापासून रोखण्यासाठी खाडीच्या तोंडावर साठवण तलाव अर्थात होल्डिंग पॉण्ड उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ आणि बेलापूरमध्ये हे साठवण तलाव उभारण्यात आले. या साठवण तलावाला झडपा आहेत. खाडीचे पाणी भरतीच्या वेळी यात नैसर्गिकरीत्या साठवले जाते आणि ओहोटी लागली की हे पाणी परत खाडीत जाते. यामुळे भरतीचे पाणी शहरात नागरी वस्त्यांपर्यंत पोहोचत नाही. तसेच, शहरातील पावसाचे पाणीही शहरात नागरी वस्तीत न साचता या तलावात साठवून त्यानंतर ते पाणी समुद्रात सोडले जावे, हाच या साठवण तलाव उभारण्यामागील मुख्य हेतू आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी या तलावांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र इतक्या महत्त्वाच्या असणार्‍या या तलावाच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेक वर्षांत पाण्यासोबत बरोबर गाळ येऊन या तलावात आत्ता गाळ साचलेला आहे. त्यामुळे तलावांची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे हा गाळ काढून या तलावांची पाणी साठवण्याची क्षमता वाढविण्याची गरज आहे. डोंगररांगा आणि खाडी किनारा यांच्या मधोमध हे शहर असल्याने डोंगरातून येणारे पावसाचे पाणी आणि खाडीतून येणारे भरतीचे पाणी वाढले की शहरात पाणी साचत आहे आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. हे रोखण्यासाठी या साठवण तलावाची क्षमता वाढवणे गरजेचे आहे.

खारफुटीचा अडथळा
नवी मुंबईतील धारण तलावाची स्वच्छता करणे आवश्यकता तरी येथे काही ठिकाणी खारफुटी वाढल्या आहेत. त्यामुळे या साठवण तलावांची सफाई करता येत नाही, अशी माहिती पालिकेचे सिटी इंजिनीअर सुरेंद्र पाटील यांनी दिली.
साठवण तलाव हे या शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे किमान दर तीन वर्षांनी या तलावांची साफसफाई होणे गरजेचे आहे. मात्र अनेक वर्षांपासून त्यांची सफाई झालेली नाही. त्यामुळे त्यात चिखल, गाळ साचला आहे. तो बाहेर काढायला हवा म्हणजे पाण्याचा योग्य निचरा होऊ शकेल.