Breaking News

नगरपरिषदेच्या फायली, शिक्के खासगी घरात

पालघर
पालघर नगर परिषदेच्या इमारत बांधकाम परवानगीच्या अनेक फायलींसह शिक्के आदी महत्त्वपूर्ण कागदपत्रे नगरपालिका क्षेत्राबाहेरील इमारतीमध्ये आढळून आल्याने पालघर पोलिस ठाण्यात काही कर्मचार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पालघर नगर परिषदेच्या इमारत बांधकाम परवानगीच्या अनेक फायलींसह, शिक्के आदी महत्त्वाची कागदपत्रे नगरपालिका क्षेत्राबाहेरील वाघुळसारनजीक असलेल्या ‘कांचन पारिजात’ या इमारतीच्या  201 या सदनिकेत आढळून आल्या. या सदनिकेत दुसरे नगरपालिका कार्यालयच स्थापन करण्यात आल्याचे घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांवरून दिसून आले. या बाबत गुन्हा नोंदविण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू आहे.
‘कांचन पारिजात’ या इमारतीच्या एका सदनिकेमध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या मिळालेल्या बांधकामाच्या परवानगीच्या फायली, अर्ज-परवानगीच्या पत्रावर मारण्यात येणारे आवक-जावकचे शिक्के आदी साहित्य होते. यावेळी वाणिज्य, लघु औद्योगिक, रहिवास, औद्योगिक, सामान्य सुविधा केंद्रासाठी नकाशांना मान्यता देण्याच्या कागदपत्रांवर मारण्यात येणारा शिक्का आदी साहित्य या सदनिकेमध्ये आढळून आल्याने हे दुसरे नगरपालिकेचे कार्यालय तर नाही ना, अशी शंका उपस्थितांमधून व्यक्त केली जात आहे.