Breaking News

वृत्तपत्र विक्रेत्यांना फेरीवाला क्षेत्रातून वगळा : आ. संजय केळकर

मुंबई
फेरीवाला हटाव मोहीम राबवताना वृत्तपत्र विक्रेत्यांना फेरीवाला समजून त्यांचे स्टॉल तोडू नयेत, त्यांच्या व्यवसायाला संरक्षण द्यावे, या आ. संजय केळकर यांच्या मागणीला नगरविकास विभागाने सकारात्मकता दर्शवून स्थानिक स्वराज्य संस्थांना तशा सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.  ठाण्यात काही दिवसांपूर्वी राबवण्यात आलेल्या फेरीवाला हटाव मोहिमेत फेरीवाल्यांसह एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलवरही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनांनी आंदोलन करत निषेधही व्यक्त केला.
आ. संजय केळकर यांनी अधिवेशनात पुन्हा एकदा वृत्तपत्र विक्रेत्यांची बाजू मांडून त्यांच्या व्यवसायाला संरक्षण देण्याची जोरदार मागणी केली. राज्यातील वृत्तपत्र विक्रेते वर्षानुवर्षे हा व्यवसाय करत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जगवण्याचे काम हा घटक करीत आहे. मात्र फेरीवाला हटाव मोहीम राबवताना स्थानिक स्वराज्य संस्था वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलवरही कारवाई करतात. वास्तविक हा व्यवसाय फेरीवाला क्षेत्रात मोडू नये. अशा कारवाईतून त्यांना सूट देऊन संरक्षण द्यावे अशी मागणी केळकर यांनी केली.  मागील अधिवेशनात तत्कालीन नगरविकास राज्यमंत्र्यांनी याबाबत आश्‍वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले होते. मात्र तरीही अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी न करता विक्रेत्यांचे स्टॉल तोडून त्यांचे आर्थिक नुकसान केले जात आहे. या प्रकरणी नगरविकास विभागाने संबंधित महापालिका अधिकार्यांना सुस्पष्ट आदेश द्यावेत अशी लेखी मागणी आ. केळकर यांनी विद्यमान राज्यमंत्री योगेश सागर यांच्याकडे  केली.  या प्रकरणी सागर यांनी संबंधितांना आवश्यक सूचना देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ठाण्यासह राज्यातील हजारो वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.