Breaking News

पाकिस्तानची आगळीक खपवून घेणार नाही : बी.एस. धनोआ

नवी दिल्ली 
भारताने जम्मू-काश्मिरातून कलम 370 काढल्यापासून बावचळलेल्या पाकिस्तानकडून दररोज युद्धाची धमकी दिली जाते. यापार्श्‍वभूमीवर भारतीय वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांनी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानची कुठलीही आगळील खपवून घेणार नाही, असा इशारा देखील धनोआ यांनी यावेळी दिला आहे. देशाच्या सीमेवर कुठलीही आगळीक रोखण्यासाठी वायुसेना कायम सतर्क असते असे धनोओ यांनी सांगितले. 
भारताने जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद 370 आणि 35-ए रद्द करून राज्याला असलेला विशेष दर्जा काढला आहे. तसेच जम्मू-काश्मीर आणि लद्दाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवलेत. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान चांगलाच संतापला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सर्वत्र डोके आपटून वैतागलेल्या पाकिस्तानने आता भारताला युद्धाची धमकी देणे सुरू केले. तर भारताकडूनही पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जात असून सेनाप्रमुख बिपीन रावत यांनी यापूर्वीच पाकिस्तानला युद्धांसारखी आगळीक न करण्याचा इशारा दिला. आता रावत यांच्या पाठोपाठ वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांनीही युद्धासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. धनोआ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संरक्षण साहित्याच्या स्वदेशीकरणासंबंधीच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना धनोआ म्हणाले की, भारतीय वायुसेना आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कायम सज्ज असते. पाकिस्तानने जर कुठली आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला वायुसेनेकडून अविलंब सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा बी.एस. धनोवा यांनी दिला.