Breaking News

एका महिन्यात नेहरु मार्केटचे काम सुरू करणार : महापौर

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील नऊ वर्षापासून प्रलंबित असलेल्या नेहरू मार्केट उभारणीच्या कामात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी लक्ष घालून मंगळवारी (दि.13 ऑगस्ट) या परिसराची पाहणी करून एका महिन्यात काम सुरु करण्याचे आश्‍वासन देत, संबंधित अधिकार्‍यांना ले-आऊट, प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले.
चितळेरोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने ओटेधारक व गाळेधारकांना हक्काची जागा मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. संघटनेच्या वतीने महापौर वाकळे, आयुक्त भालसिंग व खा.विखे यांना यापूर्वी निवेदन देऊन नेहरु मार्केटचा प्रश्‍न मांडण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी उपायुक्त प्रदीप पठारे, उपमहापौर मालन ढोणे, अभियंता कल्याण बल्लाळ, श्रीकांत निंबाळकर, चितळेरोड भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, नगरसेवक दत्ता कावरे, अजय चितळे, संतोष गुगळे, वसंत गुगळे, राजेंद्र चौधरी, सुनंदा ताठे, प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे, मार्केट विभाग प्रमुख रवी वाखारे, पुष्कर कुलकर्णी, संजय देवकर, बाळासाहेब देशमुख, दत्तोबा कोंडके, बाळासाहेब तरोटे, संजय धारक, बालाजी गौरी आदींसह भाजीविक्रते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी चितळेरोडवर भाजी विक्रेते बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून नेहरु मार्केटच्या जागेत महापालिकेने तात्पुरत्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्यास भाजी विक्रेते या मैदानात बसण्यास तयार असल्याचे संजय झिंजे यांनी सांगितले. या प्रकल्पाचे काम रखडल्याने मैदानाची जागा अनेक वर्षापासून पड आहे. मोठ्या प्रमाणात जागेमध्ये वाहनांची पार्किंग, मांडव, टपर्‍यांचे अतिक्रमण झाल्याचे  नागरिकांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिले. 
यावेळी महापौर वाकळे यांनी तातडीने संबंंधित अधिकार्‍यांना जागेची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. 9 वर्षापूर्वी नेहरु मार्केट पाडल्यानंतर 72 ओटेधारक भाजी विक्रेते व 15 गाळेधारक रस्त्यावर आले असून, एका महिन्यात प्रत्यक्ष काम सुरु करण्याचे महापौरांनी आश्‍वासन दिले.