Breaking News

मेट्रोविरोधात शिवसेनेचे आंदोलन आमदारांचा चिखलात ठिय्या


मुंबई:
 मेट्रो कारशेड कामामुळे मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात रस्त्याची दुरावस्था झाली असून त्यांच्या निषेधार्थ अणुशक्तीनगरचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी आंदोलन केलं. हा रस्ता बांधून देण्याचं आश्वासन एमएमआरडीए प्रशासनाकडून अनेकदा देण्यात आलं आहे तसे असतानाही अद्याप लोकांनी होणाऱ्या त्रासाची दखल घेतली नाही असा आरोप तुकाराम काते यांनी केला आहे.

   मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. बोगद्यांची खोदकामं, खांबांची उभारणी यामुळं अनेक ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यातून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून मुंबईकर त्रस्त आहेत. मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कारशेडचं काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळं महाराष्ट्र नगरमधील रहिवाशांना रोजच्या रोज गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

   मुंबईतील मानखुर्द परिसरात 100 एकर जागेवर मेट्रोचं कारशेड उभारण्याचं काम सुरु आहे. या कारशेडच्या कामामुळे परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि चिखल पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचं काम करा त्यानंतर कारशेड उभारा यासाठी स्थानिकांनी मेट्रोच्या कामाला विरोध केला होता. त्यावेळी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांनी लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करुन देऊ असं लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही अनेकदा यासाठी बैठका घेण्यात आल्या. स्थानिक खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली अशी माहिती तुकाराम काते यांनी दिली.

  स्थानिकांनी याबाबत आमदार काते यांच्याकडं तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन काते यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी चिखलात बसून ठिय्या दिला आहे. एमएमआरडीएचे अधिकारी येऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.