Breaking News

आम्ही सर्व गमावलं, आता लढाई हाच पर्याय

फैजल शाह यांची सरकारविरोधात पोस्ट; काय होणार, याचा अंदाज लावणेही अवघड


श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे रहिवासी असलेले माजी आयएएस अधिकारी आणि ‘जम्मू आणि काश्मीर पीपल्स मूव्हमेंट’ या पक्षाचे सर्वेसर्वा असणार्‍या शाह फैजल यांनी कलम 370 च्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम रद्द करण्याच्या आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याच्या सरकारच्या निर्णयावर फैजल यांनी फेसबुक पोस्टमधून टीका केली आहे. जम्मू काश्मीरमधील लोक सर्व काही गमावून बसले असून आता लढाई सुरू ठेवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकांना या निर्णयाचा धक्का बसला असून ते सुन्न झाले आहेत. या निर्णयाचा काय परिणाम होणार आहे याचा अंदाज काश्मीरमधील जनतेला लावता येत नाही. जे काही गमावले आहे त्याचं दु:ख सर्वांना झालं आहे. अनेकांनी या निर्णयाचे दु:ख झाल्याचे म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे मागील 70 वर्षात भारताने येथील लोकांचा केलेला हा सर्वांत मोठा विश्‍वासघात आहे, अशा दृष्टीकोनातून याकडे पाहिले जात आहे, असे फैजल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या निर्णयानंतर होणार्‍या हिंसेत आठ ते दहा हजार जणांचा मृत्यू होईल आणि सरकार त्यासाठी तयार आहे, अशी चर्चा इथे आहे. त्यामुळेच कोणालाही या नरसंहाराची संधी देता कामा नये असे आमची विवेकबृद्धी आम्हाला सांगते. या निर्णयाला उत्तर देण्यासाठी आपण जिवंत रहायला हवे, असे मला वाटते, असे फैजल यांनी नमूद केले आहे.
माझ्या ओळखीतील एका व्यक्तीला कोणीतरी आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, अशी धमकी दिल्याचे मी ऐकले. अशाच प्रकारे स्थानिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र काश्मीरमधील लोक शांत आहेत ही जमेची बाजू आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आमचा इतिहास आणि आमची ओळख दाबून टाकणारा हा कायदा घटनाविरोधी आहे. आम्ही सर्व विरोधीपक्ष एकत्र आहोत. आम्ही एकत्रच या कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार असून, हा अन्यायकारक कायदा बदलण्याची आम्ही मागणी करणार आहोत, असे फैजल या पोस्टमध्ये म्हणतात.

मोदी-शाहच विशेषाधिकार देऊ शकतील
भारत सरकारच्या या निर्णयावर आंतररष्ट्रीय समुदायाने कानाडोळा केला आहे. मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही. सर्वांत दु:खद गोष्ट ही आहे, की आमच्याकडून दिवसाढवळ्या जी गोष्ट काढून घेण्यात आली आहे, ती गोष्ट आम्हाला परत केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शाहच देऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

शंभर जणांना अटक
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर आतापर्यंत काश्मीरमध्ये 100 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असल्या, तरी परिस्थिती सामान्य आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. खोर्‍यातील शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या 100 जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

दगडफेकीत पोलिस अधिकारी जखमी
श्रीनगरमध्ये काही दुकाने उघडण्यात आली आहेत. निर्बंध असले, तरी रस्त्यावर लोकांची वर्दळ दिसत आहे. कूपवाडीतील एका व्हिडिओत कलम 370 रद्द केल्याचा आनंद असून काश्मीर खोर्‍यात शांतता हवी आहे, असे हे म्हणतात. पूँछ जिल्ह्यात एका ठिकाणी सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू असताना दगडफेकीची घटना घडली. यामध्ये एक पािेलस अधिकारी किरकोळ जखमी झाला आहे.