Breaking News

भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

विराट कोहलीचे विक्रमी शतक

पोर्ट ऑफ स्पेन
 वेस्ट इंडिज सोबतच्या दुसर्‍या एक दिवसीय सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहलीचे शतकी व श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीने भारतीय संघाला विजयपथावर नेण्यास मदत केली. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर 59 धावांनी मात केली.पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने 7 गडी राखून 279 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र सामन्या दरम्यान पावसाचे आगमन झाल्याने खेळात व्यत्यय आला. त्यामुळे यजमान संघाला विजयासाठी 46 षटकात 270 धावांचे लक्ष्य देण्यात आले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास नव्हती. विराट कोहलीने रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या साथीने महत्वाची भागीदारी करत भारतीय संघाला आवश्यक धावसंख्या उभारुन दिली. मात्र, विंडीजच्या गोलंदाजांनी मोक्याच्या षटकांवेळी भारतीय फलंदाजीवर अंकुश लावले. त्यामुळे भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले.यावेळी वेस्ट इंडिज संघ फक्त 210 धावाच काढू शकला. एविन लुईस वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. विंडीज संघाने आक्रामक पद्धतीने डावांची सुरुवात केली. मात्र 45 धावांची भागीदारी झाल्यानंतर भुवनेश्‍वर कुमारने ख्रिस गेलला माघारी पाठवले. यानंतर शाई होप, शेमरॉन हेटमायर देखील जास्त काळ खेळ पट्टीवर तग धरू शकले नाही. यानंतर निकोलस पूरन आणि लुईस यांनी चौथ्या विकेटसाठी 56 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी विंडीज मोठी खेळी करेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र कुलदीपने एविन लुईसला बाद केल्यानंतर जिंकण्याच्या सर्व आशा मावळल्या. एविन लुईसने 65 धावा केल्या होत्या.यानंतर आत्मविश्‍वासाने बळावलेल्या भुवनेश्‍वर कुमारने विंडीजच्या अखेरच्या फळीला देखील शिताफीने माघारी पाठविले. रोस्टन चेस, केमार रोच, कार्लोस ब्रेथवेट झटपट माघारी परतले. विंडीजच्या तळातल्या फलंदाजांनाही फारशी लढत देता आली नाही. परिणामी, गोलंदाजांमुळे भारतीय संघाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. या सामन्यात भारताकडून भुवनेश्‍वर कुमारने 4, कुलदीप यादव, मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी 2 तर खलिल अहमद, आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 1 बळी घेतला.

सर्वाधिक धावा करणारा विराट दुसरा फलंदाज
विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. रन मशीन समजला जाणारा विराट आता सर्वाधिक धावा करणाऱया भारतीय फलंदाजांमध्ये दुसरा ठरला आहे. विराटने 238 एकदिवसीय सामन्यात 11406 धावा केल्या आहेत. तर, सौरव गांगुलीने 300 एकदिवसीय सामन्यात 11363 धावा जमवल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर विराजमान आहे. सचिनने 463 एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. विराटचा फॉर्म असाच राहिल्यास भविष्यात तो सचिनचाही विक्रम मोडू शकतो.

विराट-रोहित जोडी ठरली अव्वल
दुसर्‍या वन-डे सामन्यात रोहित-विराटने 74 धावांची भागीदारी करत सचिन-विराट जोडीचा आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. विराट-रोहित जोडीची वन-डे कारकिर्दीतली ही 32 वी अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. सचिन-सेहवान जोडीच्या नावावर 31 अर्धशतकी भागीदारी जमा आहेत. भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याच्या विक्रम हा सचिन-सौरव गांगुली जोडीच्या नावावर आहे. या जोडीने 55 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत.