Breaking News

आशियातील उत्कृष्ट जलतरणपटू ठरला ’प्रभात’

मुंबई
कॅलिफोर्नियातील सांताबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील 20 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार केले आहे. असे करणारा मुंबईकर प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे. मुलगा उत्कृष्ट जलतरणपटू बनावा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारा खर्च परवडत नसल्यामुळे कोळी कुटुंबाने नेरुळ येथे असलेले घर विकले. त्यांनी घेतलेल्या निर्णयावर 20 वर्षीय मुलगा प्रभात कोळी खरा उतरला आहे.
नुकतेच त्याने आतापर्यंत जगभरातील केवळ 14 जलतरणपंटूनी अशी कामगिरी साधली आहे. चेंबूरच्या बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिकत असलेल्या प्रभातने सातव्या क्रमांकाची वेळ नोंदवली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेकरीता प्रशांत महासागरात सराव करत असताना प्रभातचा डावा खांदा दुखावला होता. मात्र या दुखण्यावर मात करत प्रभातने यशावर शिक्कामोर्तब केले आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 3 जुलै रोजी प्रभातने अँनाकापा ते मेनलॅन्ड हे 20 किलोमीटरचे अंतर पोहण्यास सुरुवात केली. पण, या मार्गात असलेल्या तेलाच्या विहीरीतील निघालेला तेलाचा तवंग पाण्यावर पसरला होता. सुमारे 8 किलोमीटरचे अंतर पोहून गेल्यावर पाण्यावर पसरलेल्या तेलाचा प्रभातला खूप त्रास झाला. पोहत असताना अवघ्या 15 मिनिटाच्या कालावधीत प्रभातला वारंवार उलट्या होऊ लागल्या. पुढचा धोका टाळण्यासाठी प्रभातने पाण्याबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या अपयशामुळे नाउमेद न होता 10 जुलै रोजी प्रभात मेनलॅन्ड ते अँनाकापा हे उलट अंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरला आणि त्यात यशही मिळवले. यावेळी पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहायला लागल्याने प्रभातला अपेक्षित वेळ साधता आली नाही. साधरणतः चार फुटाची लाट आणि 13 अंश सेल्सिअस पाण्याचे तापमान असताना प्रभातने 20 किलोमीटरचे अंतर 6 तास 20 मिनिटामध्ये पोहून पार केले. आशियातील सर्वात युवा जलतरणपटू-इंग्लंडच्या मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताबाच्या मानकरी असलेल्या सॅलीमेंटी ग्रॅव्हीट यांच्या मार्गदर्शानुसार सराव करणार्‍या प्रभातने दीर्घ पल्ल्याच्या जलतरणात चांगलीच छाप पाडली आहे. खुल्या पाण्यातील जलतरणात तिहेरी यश संपादन करणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे.