Breaking News

काश्मिरी गोर्‍या मुलींशी लग्न करता येणार

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य; मुस्लिम आणि अविवाहितांना संधी!

मुजफ्फरनगर
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे भाजप आमदार विक्रम सिंह सैनी यांनी कलम 370 हटवल्यानंतर पुन्हा एकदा वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयामुळे देशातील मुस्लिमांना आनंद व्हायला हवा. कारण त्यांना आता न घाबरता काश्मिरी गोर्‍या मुलींसोबत लग्न करता येणार असल्याचे सैनी यांनी म्हटले आहे. काश्मीरला जाऊन भाजपचे अविवाहित युवा नेतेही प्लॉट विकत घेऊ शकतील आणि लग्न करु शकतील असे वक्तव्य या भाजपच्या आमदार महाशयांनी केले आहे.

मुजफ्फरनगरच्या कार्यक्रमात बोलताना सिंह सैनी म्हणाले, की मोदी यांनी आपल्या सगळ्याचे स्वप्न साकार केले आहे. भाजपचे अविवाहित नेते आहेत, त्यांना काश्मीरला जाऊन लग्न करता येईल, यात आमची कोणतीही अडचण नाही. भाजपच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनाही काश्मीरच्या गोर्‍या मुलींसोबत लग्न करता येईल असे ते बरळले आहेत.
भाजप कार्यकर्ते कठौली येथे कलम 370 हटविण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर जल्लोष करण्यासाठी जमले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सैनी उपस्थित होते. त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य या कार्यक्रमात केले. सैनी यांनी यापूर्वीही एका कार्यक्रमात बोलताना भारतात राहायला ज्यांना भीती वाटत असेल, अशांना बॉम्बने उडविले पाहिजे तसेच त्यांनी देश सोडून जायला हवे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.