Breaking News

आता भारतावर हल्ला करायचा का?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बरळले; काश्मीरवरून जळफळाट

इस्लामाबाद
पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या सदस्याने भारताच्या काश्मीरविषयक निर्णयावर खंबीर भूमिका घेण्याची सूचना केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यावर उत्तर देण्याऐवजी आता भारतावर हल्ला करायचा का, अशी उलट विचारणा केली. काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला असून काय करावे, असा प्रश्‍न त्या देशाला पडला आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करणे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण करणे, या मोदी सरकारच्या ‘काश्मीर धोरणा’वर लोकसभेने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. दरम्यान, या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारताच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानच्या संसदेचे तातडीचे अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यात भारताच्या या निर्णयावर चर्चा झाली असून पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) चे नेते शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानने तिखट प्रतिक्रिया दिली पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावर इम्रान खान यांनी शरीफ यांना विरोधी नेत्यांची नेमकी काय अपेक्षा आहे? मी पाकिस्तान लष्कराला भारतावर हल्ला देण्याचा आदेश दिला पाहिजे का? अशी विचारणा केली.
मोदी सरकारने काश्मीरसंबंधी घेतलेल्या निर्णयानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयासहित लष्कराचे अधिकारी भारताविरोधात वक्तव्ये करत आहेत. अनेक खासदारांनी भारताला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे. तसेच युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी तयार राहिले पाहिजे असेही म्हटले आहे.
काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल अशी गर्भित धमकी इम्रान खान यांनी दिली. त्याचवेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबंध नव्हता, असा दावा त्यांनी केला. हे प्रकरण आपण संयुक्त राष्ट्राकडे घेऊन जाऊ असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कराचाही विरोध
पाकिस्तानी लष्कराच्या अधिकृत ट्विटरवरूनही कलम 370 हटवण्यावरून ट्विट करण्यात आले. यामध्ये काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीवर बैठक घेण्यात आल्याची माहिती दिली. लष्कर पाकिस्तान सरकारसोबत आहे. पाकिस्तानचे लष्कर भारताचा हा निर्णय स्वीकारण्यास नकार देते, असे लष्कराने म्हटले आहे.