Breaking News

काँग्रेसला काश्मीरबाबत सत्तर वर्षांत जे जमले नाही, ते आम्ही केलेः शाह

चंदीगड
सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाहिलेले एकसंध भारताचे स्वप्न पूर्ण होण्यात कलम 370 हा अडसर ठरत होता. मोदी सरकारने 75 दिवसांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केले. जवळपास 70 वर्षे काँग्रेस सरकारला मतपेटीच्या लालसेमुळे जे करता आले नाही, ते मोदी सरकारने केवळ 75 दिवसांतच करून दाखवले. कलम 370 आता इतिहास जमा झाले आहे, हरियाणातील शहीद जवानांना यापेक्षा मोठी श्रद्धांजली असू शकत नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी हरियाणातील जींद येथील एका सभेद्वारे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
या वेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, हरियाणाचे प्रभारी अनिल जैन यांच्यासह अन्य मंत्र्यांची उपस्थिती होती. शाह म्हणाले, की हरयाणात भाजपचे बहुमताचे सरकार येईल, याचा मला विश्‍वास आहे. मी मागील विधानसभा निवडणुकीवेळी या ठिकाणी आलो होतो, तेव्हादेखील तुम्ही बहुमत देत भाजपचे सरकार आणले होते. त्यानंतर लोकसभेच्या वेळी आलो, तेव्हा तुम्ही 300 चा आकडा पार करून दिला. यंदाच्या निवडणुकीतही हरयाणाची जनता पंतप्रधान मोदींना आशीर्वाद देईल, याची मला खात्री आहे.
या खट्टर यांनी शाह यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, की स्वातंत्र्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एकसंध बनवण्यासाठी जसे कार्य केले होते, तसेच काम आता कलम 370 हटवून शाह यांनी केले आहे.

हरयाणात 75 जागा जिंकण्याचे ध्येय
मिशन -75 हरयाणाच्या जनतेच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. मागील पाच वर्षात खट्टर सरकारने चांगले काम केले असल्याचेही सांगून यंदा 47 नाही, तर 75 जागा मिळाल्यावर भाजपचा विजय मानला जाईल, असे शाह म्हणाले.