Breaking News

जम्मूतील निर्बंध मागे, श्रीनगर खोर्‍यात कायम

श्रीनगर
कलम 370 रद्द करण्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये संचारबंदीसह अनेक निर्बंध घालण्यात आले होते. आता हळूहळू निर्बंध शिथिल करण्याच्या दिशेने पावले उचलली जात असून जम्मूतून संचारबंदीसह सर्व निर्बंध बुधवारी हटवण्यात आले आहेत; मात्र काश्मीरमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत.

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केले आहे. या निर्णयावरून काश्मीर खोर्‍यात हिंसाचार उफाळण्याची शक्यता असल्याने संचारबंदीसह दूरसंचार सेवा आणि वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते. परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध काढून घेण्यात येत आहे. त्याची सुक्षसवात जम्मूतून करण्यात आली आहे. याविषयी जम्मूचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मुनीर खान म्हणाले, की जम्मूमधून पूर्णपणे निर्बंध हटवण्यात आले आहे; पण काश्मीरमधील काही भागात कायम ठेवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने काश्मीर खोर्‍यात संचारबंदीसह दूरसंचार, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. याचा परिणाम स्थानिकांच्या जीवनावर झाला आहे. दूरसंचार सेवा बंद असल्याने नागरिकांना प्रशासनाने सुरू केलेल्या फोन सेवेसाठी रांगेत उभे राहावे लागते आहे. काश्मीर खोर्‍यातील हे निर्बंध उठवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने प्रशासनाच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून, परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला वेळ दिला आहे.