Breaking News

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची भारताला धमकी

संयमाचा अंत झाल्यास जिहादची घोषणा करण्याचा इशारा; युद्धाला युद्धनेच उत्तर

इस्लामाबाद
जम्मू-काश्मीरकडून विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारताला इशारे दिले जात आहेत. बुधवारी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांनी भारताला जिहादची धमकी दिली आहे.

पाकिस्तानच्या या धमक्यांवरून तिथे कशा प्रकारे खळबळ माजली आहे, हे स्पष्ट होते कारण ते आपला स्वातंत्र्यदिनही आनंदाने साजरा करू शकत नाहीत. अल्वी यांनी स्वांतत्र्यदिनी पाकिस्तानला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे, की पाकिस्तानला युद्ध नको आहे; मात्र जर भारताने युद्ध छेडले तर पाकिस्तानकडे युद्धानेच उत्तर देण्याचा आणि जिहाद पुकारण्याशिवाय कोणताही पर्याय नसेल. अल्वी पुढे म्हणाले, की आज संपूर्ण जग पाहत आहे, की पाकिस्तान काश्मीरच्या लोकांसोबत उभा आहे आणि त्यांना कायमच साथ देण्यास तयार आहे. पाकिस्तान काश्मिरींची मदत करणे थांबवणार नाही. पाकिस्तान या प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतपर्यंत जाईल.

भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करून संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच भारताने सिमला कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. यातील हास्यास्पद बाब म्हणजे याच सिमला कराराची खुद्द पाकिस्ताननेच कधी पर्वा केलेली नाही. भारतातील पाकिस्तानचे हंगामी उच्चायुक्त एस.एच.शाह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काश्मिरी जनतेच्या स्वातंत्र्याच्या संघर्षात पाकिस्तान तुमच्यासोबत आहे. आम्ही काश्मिरी जनतेला पूर्णपणे राजकीय आणि राजनैतिक पाठिंबा देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अरीफ अल्वी यांनी काश्मिरींना भारताविरोधात ‘सोशल मीडिया’ युद्ध पुकारण्यास आव्हान केल्यानंतर शाह यांनी हे विधान केले.
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानची भारताविरोधात आगपाखड सुरू आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. ‘सोशल मीडिया’वर खोटया बातम्या पसरवल्या; पण सर्वच ठिकाणी ते अपयशी ठरले आहेत.

पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचा घरचा आहेर
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अप्रत्यक्षपणे संयुक्त राष्ट्रात पाकिस्तान अपयशी ठरल्याची कबुली दिली. मूर्खाच्या नंदनवनात राहू नका. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी फुलांची माळ घेऊन थांबली आहे, असे समजू नका, असे कुरेशी म्हणाले. भारताने आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून हा निर्णय घेतल्याचे रशियाने जाहीर केल्यानंतर शाह मेहमूद कुरेशी यांनी हे वक्तव्य केले.


युद्धाला तयार असल्याची इम्रान खान यांची दर्पोक्ती
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरच्या मुजफ्फराबादमध्ये आले होते. येथे त्यांनी लोकांना संबोधित केले. पाकिस्तान कधीही युद्धासाठी तयार आहे. जर भारत-पाकमध्ये युद्ध झाले, तर त्याला भारत जबाबदार असेल, असे ते म्हणाले.