Breaking News

मनुष्यबळाच्या वापराविषयी मोदी अनभिज्ञ:ओवेसी

दिल्ली

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनी देशभरातील लोकांना छोटी कुटुंब ठेवण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या वक्तव्यावर एमआयएम नेते असदुद्दिन ओवेसी यांनी शरसंधान साधत मनुष्यबळाच्या वापराविषयी मोदी अनभिज्ञ आहेत. युवा जनसंख्येच्या क्रयशक्तीचं महत्त्व मोदींना माहित नसून ते स्वत:च्या जबाबदारीहून पळ काढत आहेत अशी टीका ओवेसींनी केली आहे.

 छोटे कुटुंब असणं हीच खरी देशभक्ती असं वक्तव्य मोदींनी गुरुवारी केलं होतं. तसंच अनियंत्रित लोकसंख्या वाढीला आळा घालण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली होती. यावर ओवेसींनी टीका केली आहे. ' देशातील आताची युवा लोकसंख्या २०४० पासून उत्पादन क्षम असणार आहे. तेव्हा या जनतेचा योग्य प्रकारे वापर कसा करून घ्यायचा हे पंतप्रधानांना माहित नाही. त्यामुळे सुशासनाच्या जुन्या आणि निरुपयोगी कल्पना ते घेऊन येत आहेत आणि स्वत:च्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत'.असं मत ट्विटरच्या माध्यमातून ओवेसींनी मांडलं आहे. याआधीही सरकारच्या धोरणांवर अनेकदा ओवेसींनी टीका केली आहे.

   दुसरीकडे जे पी नड्डांसोबत भाजपातील अनेक नेत्यांनी मोदींच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. मोदींचं भाषण अत्यंत प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.