Breaking News

टिळकांच्या कार्यातील शौर्य, तेजस्विता मुलांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता : चंद्रशेखर वझे

अंबरनाथ
लोकमान्य टिळकांच्या कार्यातील पराक्रम, शौर्य, तेजस्विता लहान मुलांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते चंद्रशेखर वझे यांनी केले. येथील ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालया तर्फे चंद्रशेखर वझे यांचे व्याख्यान वाचनालयाच्या श्रीराम देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना वझे यांनी वरील प्रतिपादन केले. या वेळी  वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण मथुरे यांनी स्वागत, तर सुरेखा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, सुवर्णा बर्वे यांनी प्रास्तविक तर मिलिंद आमडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
लोकमान्य टिळक हे सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी अभ्यास करतांना स्वतःची प्रकृती, शरीर स्वास्थ्य उत्तम असावे या साठी टिळकांनी ऐन शिकण्याच्या वयात एक वर्ष शाळेत न जाता सातत्याने व्यायाम करून आपले शरीर पिळदार केले हे आताच्या लहान मुलांना समजावून सांगितले पाहिजे. लोकमान्य टिळक यांचे पराक्रम, शौर्य, तपश्‍चर्या लहान मुलांना सांगणे आवश्यक असल्याचे चंद्रशेखर वझे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवीनच हे त्यावेळपासून सांगितले जाते मात्र त्याचा नेमका अर्थ सांगितला जात नाही. हक्क आहे मग तो मिळवायचा का? तर हक्क मिळवायचा नसून स्वराज्य हे हक्क वापरून  मिळवायचे असा अर्थ आहे,
लोकमान्यांची लोकप्रियता प्रचंड होती. त्यांच्या अंत्ययात्राला लाखोंचा जनसागर उपस्थित होता असे सांगून चंद्रशेखर वझे म्हणाले त्यांच्या चितेवर एका मुस्लिम व्यक्तीने आत्मदहन केले होते. टिळक हे हजरजबाबी व्यक्तिमत्व होते याबाबत सांगताना त्यांनी एक किस्सा सांगितला. एका कार्यक्रमात प्रबोधनकारांची आणि टिळकांची भेट झाली. त्यावेळी टिळकांनी प्रबोधनकारांचे कौतुक केले,तुमचा अभ्यास प्रचंड आहे असे टिळकांनी सांगितले. त्यावर प्रबोधनकार टिळकांना म्हणाले, पण ब्राह्मण पुढे येऊन देत नाहीत ना यावर हजरजबाबी टिळक हसतहसत म्हणाले क्षत्रियांना ब्राह्मणांची मदत कधी पासून लागायला लागली. टिळक आणि सावरकर हि आपली आवडती व्यक्तिमत्व आहेत असे सांगताना सावरकर यांचेही किस्से.चंद्रशेखर वझे यांनी यावेळी सांगितले.