Breaking News

चिनी वस्तूंवर बहिष्काराचे संघास्त्र!

नागपूर
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये चीननेदेखील पाकिस्तानचीच री ओढली. भारतातील अंतर्गत मुद्यांमध्ये चीनकडून हस्तक्षेपाचा प्रयत्न होत असताना संघ परिवाराने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वदेशी जागरण मंचातर्फे देशभरात चिनी वस्तूंविरोधात मोहीम राबविण्यात येणार आहे.

स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची संघ परिवाराची नेहमीच भूमिका राहिलेली आहे; मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत अर्थव्यवस्थेवर चीनकडून झालेले आक्रमण थोपविता आले नाही. आता सणासुदीच्या तोंडावर चिनी वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे चीनला आर्थिक दणका देण्यासाठी स्वदेशी जागरण मंचातर्फे देशपातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहसंयोजक डॉ.अश्‍वनी महाजन यांनी दिली.
स्वदेशी जागरण मंचतर्फे या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असून विविध स्वयंसेवी संघटना, व्यावसायिक संघटनांनादेखील यात समाविष्ट करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात येईल. चिनी वस्तूंचा वापर नागरिकांनी शक्य तितका थांबवावा, यासाठी स्थानिक पातळीपासून मोहीम राबविण्यात येणार आहे. यात ‘सोशल मीडिया‘चीदेखील मदत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.