Breaking News

मोहम्मद शहझाद याचे क्रिकेटमधून अनिश्‍चित काळासाठी निलंबन

नवी दिल्ली
आशिया चषकात दमदार कामगिरी करणारा अफगाणिस्तानचा खेळाडू  मोहम्मद शहझाद याचे क्रिकेटमधून अनिश्‍चित काळासाठी निलंबन करण्यात आले आहे. विश्‍वचषक स्पर्धांमध्ये देखील 2019 मध्येही त्याला तडकाफडकी मायदेशी पाठवल्यामुळे तो चर्चेत होता. आता मात्र तो एका निराळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने मोहम्मद शहझाद याचे अनिश्‍चित काळासाठी निलंबन केले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या नियमावलीचा भंग केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा नावावर असणारा शहझाद याने अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाची परवानगी न घेता परदेशी प्रवास केला. त्यामुळे त्याला या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला देशाबाहेर जायचे असल्यास त्यासाठी मंडळाची परवानगी गरजेची आहे. शहझादने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. मोहम्मद शहझादला शिस्तपालन समितीपुढे 20 आणि 25 जुलै या दोन तारखांना हजर राहण्याचे आदेश होते, पण तो दोनही वेळा हजर राहिला नाही. आता ईदच्या सुटीनंतर पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर मोहम्मद शहझादच्या शिक्षेवर अंतिम निर्णय घेण्यात येईल. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाकडे चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण आणि सराव साहित्य आहे. त्यामुळे अशा कारणांसाठी कोणालाही परदेशी जाण्याची गरज नाही, असे अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या पत्रकातून नमूद केले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाची 9 सप्टेंबरपासून बांगलादेशशी एकमेव कसोटी सुरू होणार आहे. त्यासाठी मोहम्मद शहझादशिवाय मैदानात उतरण्याची तयारी करावी लागणार आहे.