Breaking News

शुभमान गिलचा सर्वात कमी वयात द्विशतकाचा विक्रम

त्रिनिदाद
भारताचा उदयोन्मुख युवा फलंदाज शुभमान गिल हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर परदेशात प्रथम श्रेणी द्विशतक करणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय फलंदाज आहे. शुभमानने अद्याप वयाची विशीसुध्दा गाठलेली नाही. गुरुवारी विंडीज ‘अ’ विरुध्द नाबाद 204 धावांची विक्रमी खेळी करताना त्याचे वय 19 वर्ष 334 दिवस होते.
त्याने परदेशात सर्वात कमी वयात प्रथम श्रेणी द्विशतक करताना अब्बास अली बेग यांचा 60 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बेग यांनी 1959 मध्ये 20 वर्षे 79 दिवस वयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसाठी फ्री फॉरेस्टर्सविरुध्द नाबाद 221 धावांची खेळी केली होती. याशिवाय कोणत्याही प्रथम श्रेणी भारतीय संघातर्फे सर्वात कमी वयात द्विशतक करताना तो गौतम गंभीरपेक्षा तरुण ठरला. गंभीरने 2002 मध्ये अध्यक्षीय संघातर्फे झिम्बाब्वेविरुध्द द्विशतक केले होते तेंव्हा त्याचे वय 20 वर्ष 124 दिवस होते. एकीकडे भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकावर दमदार फलंदाजाचा शोध सुरु  आहे तर दुसरीकडे शुभमानने ही खेळी करुन आपण त्या प्रश्‍नाचे उत्तर असल्याचे दाखवून दिले आहे. विंडीज ‘अ’ विरूध्दच्या अनधिकृत कसोटी सामन्यात गुरुवारी त्याने नाबाद 204 धावांची खेळी करताना शतकवीर कर्णधार हनुमा विहारीसह (118) पाचव्या गड्यासाठी 315 धावांची विशाल भागिदारी केली. या दोघांनी 4 बाद 50 वरुन भारताचा डाव सावरला. त्यांच्या भागीदारीमुळेच भारताला विंडीज,’अ’ समोर सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी 373 धावा करण्याचे आव्हान ठेवता आले. विशेष म्हणजे दुसर्‍या डावात 204 धावा करुनही बाद न झालेला शुभमान पहिल्या डावात मात्र पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला होता. त्याच्या अडीचशे चेंडूच्या द्विशतकी खेळीत 19 चौकार आणि दोन षटकार होते.