Breaking News

आसाम सरकार 200 नवीन परदेशी न्यायाधिकरण करणार सुरु

गुवाहाटी 
एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी संदर्भात नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी आसाम सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. जे नागरिक राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंतिम 
यादीवर समाधानी नाहीत किंवा ज्यांचे यादीत नाव नाही अशा नागरिकांच्या सोयीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात 200 नवीन परदेशी न्यायाधिकरण सुरु करण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला  
आहे. 31 ऑगस्ट रोजी केंद्र सरकार आणि आसाम सरकारने मिळून बहुप्रतिक्षित एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी प्रकाशित केली. सीमावर्ती भागात विशेषत: आसाम  सारख्या प्रदेशात अवैध घुसखोरी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून हे अभियान हाती घेण्यात आले. राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंतिम यादीनुसार आसाममध्ये , 3 कोटी 11 लाख नागरिकांच्या समावेश असून 19 लाख 6 हजार 657 नागरिकांना या यादीतून वगळण्यात आले आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी www.nrcassam.nic.in या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली. अंतिम यादी जाहीर केल्यानंतर नागरिकांनी आपले नाव तपासण्यासाठी एनआरसी सेवा केद्रांपुढे मोठमोठया रांगा पाहावयास मिळत आहेत. या यादीत स्थान मिळवू शकले नाही त्यांना पूर्ण न्याय मिळवून देण्यात येईल तसेच प्रकिया पूर्ण झाल्या शिवाय कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे आश्‍वासन एनआरसी प्रशासनाकडून देण्यात आले आहे.