Breaking News

21 व्या नगर महोत्सवास 8 सप्टेंबरपासून प्रारंभ

अहमदनगर/प्रतिनिधी
“21 व्या नगर महोत्सवास 8 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून, या महोत्सवात मागील 20 वर्षांप्रमाणेच कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांबरोबरच सर्वांच्या आकर्षणाचा बाल महोत्सव, आशा शाह स्मृती महिला महोत्सव, पथनाट्य आणि चित्रकला, बुद्धीबळ स्पर्धांसह विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे आहे’’, अशी माहिती नगर व्यासपीठाचे संचालक आणि नगर महोत्सवाचे मुख्य संयोजक सुधीर मेहता यांनी दिली.
1998 साली तत्कालीन जिल्हाधिकारी विजयकुमार, पोलीस अधीक्षक हिमांशू राय यांच्या पुढाकाराने नगर महोत्सवास प्रारंभ झाला. नगर व्यासपीठचे अध्यक्ष स्व.गोपाळराव मिरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ पत्रकार स्व.जणूभाऊ काणे यांच्या प्रेरणेतून या महोत्सवात जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, सर्व कला, क्रीडा, नाट्य संस्था यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. हा महोत्सव रविवारी (8 सप्टें.) रावसाहेब पटवर्धन स्मारकात दुपारी 1 वा. बाल महोत्सवाने शुभारंभ होईल.3 ते 15 वयोगटातील बालकांना यात संगीत गायन, वादन, नृत्य, समूह नृत्य, एकपात्री, कथाकथन, फॅन्सी ड्रेस अशा विविध प्रकारात सहभागी होता येईल. एकच स्पर्धक कितीही स्पर्धेत सहभागी होऊ शकेल.
10 सप्टेंबरला रावसाहेब पटवर्धन स्मारकात दुपारी 1 वा. आशा शाह महिला महोत्सवात रांगोळी, मेहंदी, हेअर स्टाईल (केशरचना) आणि पाककृती अशा स्पर्धा होतील. पाककृती स्पर्धेसाठी खुल्या गटात उपवासाचे पदार्थ सादर करता येईल. तर महिला बचत गटांसाठी शालेय मुलांचा खाऊ. दुपारचे पौष्टीक टिफीन असा पदार्थ घरुन करुन आणावयाचा आहे.
स्पर्धकांचा आणि शाळांचा नगर महोत्सवातील स्पर्धा व कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद असतो. स्व.गोपाळराव मिरीकर व स्व. शशिकांत राजगुरु सुगम संगीत, चित्रकला, बुद्धीबळ, जलतरण, नगर महोत्सवश्री अशा स्पर्धा संघटनांच्या सोईनुसार दरवर्षीप्रमाणे होतील. या व्यतिरिक्त मराठी-हिंदी गीते, गझल, काव्यवाचन, महिलांसाठी ‘नगरची महाराणी’ हा विशेष कार्यक्रम अशा भरगच्च, दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक स्व.आसाराम शिंदे स्मृती गणेशोत्सव देखावे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धक, संस्थांनी नावनोंदणीसाठी सुधीर मेहता, तळमजला, साई आराधना अपार्टमेंट, राधा-कृष्ण मंदिरासमोर गुगळे वकीलमागे, पापय्यागल्ली (जुनी गुंडू साडी), नगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.