Breaking News

मुंबईप्रमाणे ठाणेकरांनाही 300 चौरस फूट घर मिळावे

भरपावसात झोपडपट्टीधारकांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मुंबई
 
 मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे शहरातील झोपडपट्टी धारकांना देखिल 300 चौरस फुटाचे घर मिळावे या मागणीसाठी भरपावसात शेकडोंच्या संख्येने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरांकडून निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास येत्या विधानसभा निवडणुखविर बहिष्कार घालण्याचा इशारा ठाणे शहर झोपडपट्टी रहिवाशी संघटनेच्यावतीने देण्यात आला.
मुंबई शहरात पूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 269 स्क्वेअर फुटाचे घर दिले जात होते. मात्र मे 2018 रोजी मुंबई मध्ये राहणाऱया झोपडट्टीधारकांना 300 स्क्वेअर फुटाचे घर देण्याचा निर्णय झाला. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे शहाराला हा निर्णय लागु करण्यात आला नाही. या निर्णयामुळे ठाणेकर झोपडीधारकांवर अन्याय झालेला आहे.
एसआरए योजनेसाठी मुंबईला मिळणारा एफएसआय व मुंबईला लागून असलेल्या ठाण्याला मिळणारा एफएसआय यामध्ये 31 स्क्वे.फुटाचा फरक, एखादा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना मुंबईला 51 टक्के झोपडपट्टीधारकांची सहमती व तोच प्रकल्प ठाण्यामध्ये राबवायचा झाल्यास त्याकरीता 70 टक्के झोपडीधारकांची संमती, मुंबईसाठी चटईक्षेत्र निर्देशांक 4.00 तर ठाण्यासाठी 3.00 चटईक्षेत्र आहे. योजना एकच आणि प्राधिकारण पण एकच निकष वेगवेगळे कसे असा सवाल करण्यात आला. ठाणे महानगरपालिका हद्दीत 2011 च्या जनगणनेनुसार शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच इतर विविध जमिनींवर एकूण 210 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे साडेनऊ लाखाच्या घरात नागरिक वास्तव्य करित आहेत. झोपडीमध्ये राहणाऱया नागरिकांचे राहणीमान सुधारावे यासाठी शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र आता शासन मुंबईसाठी एक न्याय व ठाण्याला वेगळा का? असा सवाल उपस्थित करीत शासन ठाण्यातील झोपडपट्टीवासियांवर अन्याय करीत असल्याचा आरोप राकेश मोदी यांनी केली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबईला लागू असलेले नियम ठाण्यासाठी लागू करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास या झोपडपट्ट्यांमधील 9 लाख नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत. यावेळी ठाणे शहर झोपडपट्टी रहिवाशी संघटनेचे अध्यक्ष राकेश मोदी, आनंद कांबळे, महादेव पवार, विजयप्रताप सिंह, इमॅन्युअल नाडार, प्रमोद पांडे, सुरेश खेराडे, सितारम नायडू, बाबा राऊत, उमा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.