Breaking News

पूरग्रस्त शाळांच्या उभारणीसाठी बालभारतीकडून 57 कोटी रुपयांचा निधी

मुंबई
कोल्हापूर आणि सांगलीसह राज्यात विविध ठिकाणी मागील काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 2 हजार 177 शाळांच्या उभारणी आणि दुरूस्तीसाठी बालभारतीने पुढाकार घेतला आहे. यासाठी 57 कोटींचा निधी देण्यास बालभारतीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यासह मराठी भाषेस संपन्नता मिळवून देण्यासाठी तज्ज्ञ समितीचे गठण आणि शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण मंत्री तथा पाठ्यपुस्तक मंडळ आणि बालभारतीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयोजित बैठकीत अनेक महत्वाचे प्रस्ताव मंजूर केले. यात राज्यातील पूरस्थितीमुळे मोडकळीस आलेल्या तसेच पडलेल्या शाळांची उभारणी, दुरूस्ती करणे तसेच इतर महत्त्वाचे शैक्षणिक प्रकल्प राबविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान या संस्थेमार्फत राज्यातील ग्रामीण भागातील एक हजार गावांचे परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात शाश्‍वत विकासासाठी 10 कोटींची रक्कम मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृती रकमेव्यतिरीक्त प्रति विद्यार्थी वार्षिक 750 रूपये बालभारतीमार्फत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना आता किमान 990 ते कमाल 1 हजार 750 रूपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 32 हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना होणार आहे. राज्यातील 725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प राबविण्यासाठी 50 कोटीच्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. तसेच मुंबई येथे अद्ययावत ग्रंथालय सुरू करण्यासाठी 5 कोटींचा निधी ग्रंथाली विश्‍वस्त संस्थेला दिला जाईल. बालभारतीच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्धीसाठी प्रसार आणि प्रचाराच्या माध्यमातून मराठी भाषेस संपन्नता मिळवून देण्यासाठी तज्ज्ञ समितीचे गठण करण्यास मंजुरी देण्यात आली.