Breaking News

सुरेंद्र गडलिंगच्या जामीन अर्जावर 7 सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी

गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे 2016 मध्ये झालेल्या 80 वाहनाच्या जाळपोळप्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड.सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जावर आजपासून येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरु झाली. याप्रकरणी युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने अंतिम सुनावणी 7 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेल्या माओवाद्यांचे कट्टर समर्थक असलेले प्रा. वरवरा राव आणि वकील सुरेंद्र गडलिंग यांच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील 2016 च्या जाळपोळ प्रकरणात गुन्हा दाखल करुन गडचिरोली पोलिसांनी त्यांना 30 जानेवारी 2019 रोजी अटक केली होती.
’माओवादी नेत्याचे मार्गदर्शक’ असा आरोप असलेले प्रा. वरवरा राव यांच्यासह नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग यांना गेल्यावर्षी पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून दोघे पुणे पोलिसांच्या ताब्यातच होते. गडचिरोली जिल्ह्यात 2016 मध्ये सूरजागड पहाडावर माओवाद्यांनी 80 वाहने जाळली होती. माओवादी कारवायांच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी जाळपोळ असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात जहाल माओवादी नेता नर्मदक्कासह मृत कमांडर साईनाथचाही सक्रिय सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणात वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेची चौकशी सुरू होती. तपासादरम्यान पोलिसांना सापडलेल्या काही हार्ड डिस्कसह कागदपत्रांवरून गडचिरोली पोलिसांनी सूरजागडच्या जाळपोळ प्रकरणात प्रा. वरवरा राव आणि वकील सुरेंद्र गडलिंग या दोघांविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.सूरजागडच्या जाळपोळीचा कट रचणे, कटात सहभाग आणि संपत्तीची जाळपोळ करणे असे आरोप या दोघांवर ठेवण्यात आले आहेत. 30 जानेवारी 2019 ला संध्याकाळी पुणे पोलिसांनी वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या दोघांना गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी या दोघांना विमानाद्वारे नागपूरला आणल्यानंतर तेथून थेट अहेरीला नेण्यात आले. तिथे अहेरीच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. सध्या दोघेही कारागृहात आहेत. दरम्यान सुरेंद्र गडलिंग यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केल्यानंतर आजपासून गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांच्या जामीनावर मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश खटी यांच्या उपस्थितीत सुनावणीस प्रारंभ झाला. गडलिंग यांच्या वतीने 5 ते 7 तज्ज्ञ वकिलांची चमू उपस्थित होती. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान काम पाहत आहेत.