Breaking News

गांजीभोयरेत एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय


पारनेर/प्रतिनिधी
 पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे या गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. अशी माहिती सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे यांनी दिली आहे. शनिवारी (दि.31) ग्रामस्थांची ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती. सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते.
  यावेळी पारनेरचे पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत एक गाव एक गणपती हा उत्सव राबवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी एकमताने घेण्यात आला. 
  यावेळी सरपंच डॉ. खोडदे म्हणाले की, आज जसा एक गाव एक गणपती हा निर्णय घेतला. तसेच भविष्यात एक गाव एक अखंड हरिनाम सप्ताह, पाणलोट विकास कार्यक्रम, सामुदायिक विवाह सोहळा, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करण्यात येणार आहे. गेली दहा वर्षात गाव व परिसरात विकासकामे झाली आहेत. यामध्ये गावकर्‍यांनी संघटीत होवून पाठबळ देण्याचे काम केले आहे. दोन महिन्यापासून वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे. गावच्या सुरक्षेसाठी पारनेर पोलिस ठाणे चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. गावकर्‍यांनी एक गाव एक गणपती उत्सव हा निर्णय घेऊन गाव विकासासाठी पाठबळ देण्याचे धोरण सर्वानुमते घेतल्याबद्दल सरपंच डॉ. खोडदे यांनी गावकर्‍यांना धन्यवाद दिले. पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी यावेळी गावकर्‍यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.
 यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.