Breaking News

विधानसभेच्या निवडणुकीबाबत पवार-सोनिया यांच्यात चर्चा

नवीदिल्ली
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या दिल्ली येथील 10 जनपथ या निवासस्थानी भेटीसाठी पोहचले आहेत. या दोघांमध्ये पाऊण तासांहून अधिक काळ चर्चा सुरू होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधीही लागू शकते. त्याच संदर्भात सोनिया यांच्याशी चर्चा करण्यासाठी  पवार दिल्ली येथे गेले होते. या दोघांमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काय करायचे, याबाबत चर्चा झाल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना भाजपने आस्मान दाखवले. आता विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला कशी टक्कर द्यायची, याबाबत या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातले अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्षाची साथ सोडून भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत. या सगळ्या परिस्थितीत निवडणूक, रणनीती या दोन्ही याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली होती. तसेच राष्ट्रवादीलाही पराभवाचा सामना करावा लागला होता. आता महाराष्ट्रात काही नवी खेळी खेळायची असेल, तर त्यासाठी काय काय पर्याय असतील, यावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.