Breaking News

माझ्या भाजप प्रवेशाला शिवसेनेची आडकाठीः राणे

पुणे / प्रतिनीधी
बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेना ही शिवसेना होती; पण आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली. भाजप प्रवेशासाठी शिवसेनाच आडकाठी आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये ‘युवर्स ट्रूली नारायण राणे’ कार्यक्रमात ते बोलत होते. राणे यांनी नुकत्याच लिहिलेल्या ‘झंझावात’ या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी राणे यांनी शिवसेनेशी आलेला संबंध, राजकारणातील प्रवेश, बाळासाहेब ठाकरे सोबतची पहिली भेट, कौटुंबिक पार्श्‍वभूमी, बेस्टचे अध्यक्ष म्हणून केलेले काम, मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द, शिवसेनेला दिलेली सोडचिठ्ठी अशा विविध विषयांवर दिलखुलास भाष्य करत अनेक गौप्यस्फोट केले.

बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धवपेक्षा माझ्यावर प्रेम केले, असे सांगून राणे म्हणाले, की  शिवसेनेत आम्ही जेवढी आंदोलने केली, तेवढी आंदोलने उद्धव यांना माहितीही नाहीत. आताची शिवसेना व्यवसायिक झाली आहे. शिवसेनेत दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतही मी सर्वाधिक लोकप्रिय होतो, अपवाद फक्त उद्धव ठाकरे यांचा. त्यांना चांगले दिसत नाही आणि चांगल्या व्यक्तीचे कौतुकही करवत नाही, अशी टीका त्यांनी केली. त्याचवेळी बाळासाहेबांपासून दूर गेल्याचा अजूनही त्रास होतो, अशी कबुली त्यांनी दिली.

जोशी, देसाईंकडून कारस्थाने
राणे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सध्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या विरोधात कारस्थाने केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, की माझ्या कामाची स्टाईल पाहून जोशी आणि देसाई यांनी माझ्याविरोधात कारस्थाने केली. उद्धव ठाकरे सोडले, तर अन्य सर्वपक्षीयांशी माझे चांगले संबंध आहेत, असे सांगताना त्यांनी काँग्रेसमध्ये पक्षासाठी काही करावे, अशी नीतिमत्ता उरलेली नाही, अशी टीका केली.