Breaking News

वायुदलाच्या प्रमुखांसह अभिनंदन यांची गगनभरारी

नवी दिल्ली
पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे भारतीय हवाई दलातील विग कमांडर अभिनंदन वर्धमान पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पाकिस्तानच्या तावडीतून सुटल्यानंतर अभिनंदन यांनी पठाणकोट विमानतळावर मिग-21 विमानाचे उड्डाण केले. या वेळी त्यांच्यासोबत हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआही उपस्थित होते.

आज सकाळी 11.30 वाजता अभिनंदन यांनी मिग-21चे टेकऑफ केले. अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर पुन्हा पठाणकोट विमानतळावर विमानाचे लँडिंग करण्यात आले. हे विमान मिग-21चे ट्रेनर व्हर्जन आहे. या वेळी अभिनंदन यांचा लूक पूर्णत: बदलेला दिसला. त्यांनी मिशांची स्टाइल आणि हेअर स्टाइलही बदलेली दिसली; मात्र विमान उडवतानाचा त्यांचा जोश तसाच होता. अभिनंदन यांनी यापूर्वी पाकिस्तानचे एफ-16 हे विमान हवेतच पाडले. या वेळी त्यांच्या विमानाचेही मोठे नुकसान झाले. त्यांचे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते; मात्र भारताच्या कुटनीतीमुळे पाकिस्तानला अवघ्या 24 तासांत त्यांना सोडावे लागले.