Breaking News

दलितमित्र दादा पाटील यांचा संघर्षमय जीवनपट प्रेरणादायी : पवार

कर्जत/प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्जतमध्ये कार्यरत असलेले रयतचे संकुल काळाबरोबर बदलत आहे. रचनात्मक व गुणात्मक दृष्ट्या प्रगती साधून नाव लौकीकात भर टाकीत आहे. या बदलाच्या मुळाशी दलितमित्र दादा पाटील यांच्या त्याग आणि संघर्षमय जीवनपट आहे, याचे सर्वांनी स्मरण करावे असे प्रतिपादन युवक नेते रोहित पवार यांनी केले.

 रयत संकुलच्या वतीने आयोजित केलेल्या दलितमित्र दादा पाटील यांच्या २८ व्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके होते. यावेळी प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, सुनंदाताई पवार, बाप्पाजी धांडे, बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले-पाटील, दादासाहेब सोनमाळी, तात्यासाहेब ढेरे, ॲड. सचिन पाटील, प्रा. किरण पाटील, सतीश पाटील, निर्मला पाटील, सुरेश खिस्ती आदी मान्यवर उपस्थित होते.

 अध्यक्षीय भाषणात राजेंद्र फाळके यांनी दादा पाटील यांचे शैक्षणिक कार्य रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात अतुलनीय असल्याचा उल्लेख करीत कर्मवीर अण्णांच्या कार्यानंतर दादा पाटलांच्या कार्याचा विचार करावा लागतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 प्रा. किरण पाटील, प्रा.रजनी पाटील यांनी दादा पाटलांच्या आठवणीवर मनोगत व्यक्त केले. बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी युवकांना प्रेरणादायी ठरावा असा संवाद साधत मनोगत व्यक्त केले.