Breaking News

कृष्णेच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र-कर्नाटक एकत्र

मुख्यमंत्री फडणवीस आणि येडीयुरप्पा यांचे बैठकीत एकमत

पूर व्यवस्थापनासाठी दोन्ही राज्यांची उच्चस्तरीय समिती

मुंबई
आंध्र प्रदेशने कृष्णा नदीच्या पाणी पुनर्वाटपावरुन नव्याने दिलेल्या निर्णयाचा महाराष्ट्र आणि कर्नाटक एकत्रितरित्या विरोध करणार आहे असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ठरले आहे. कृष्णा नदीच्या प्रश्‍नावरुन आंध्रप्रदेश आणि तेलंगण यांच्याविरोधात महाराष्ट्र-कर्नाटकची युती झाली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यावरुनही चर्चा झाल्याची माहिती पुढे आली. देवेंद्र फडणवीस आणि येडियुरप्पा यांनी संयुक्तपणे आंध्रप्रदेशच्या निर्णयाला विरोध करण्याचे ठरवले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पुनर्वाटपा संदर्भात जो निर्णय आंध्रने घेतला आहे त्याला आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने एकत्रितरित्या विरोध करायचे ठरवले आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
कृष्णा लवादाने तत्कालिन आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या दरम्यान पाणी वाटपावर निर्णय दिला आहे. तथापि आंध्रप्रदेशने आता तेलंगणा राज्य निर्मितीनंतर पाण्याचे फेर नियोजन व्हावे अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी याचिका दाखल केली आहे. लवादाने तत्कालिन संयुक्त आंध्र प्रदेशसाठी निर्णय दिला आहे. त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या वाटपाबाबत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांनी दोहोतच तोडगा काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे लवादाला आव्हान देण्याच्या आंध्र प्रदेशच्या भुमिकेला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही राज्यांतील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त अशी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांतील धरणांच्या पाण्याबाबत नियोजन करण्यात येईल आणि समन्वय राखण्यात येणार आहे. गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा आले होते. कर्नाटकचे उप मुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्‍वत्थनारायणन आणि कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज हेदेखील येडियुरप्पा यांच्यासोबत आले होते. यावेळी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये गेल्या महिन्यात महापूर आला होता. त्यातून राज्य सावरते आहे. मात्र भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये यासाठी या दोघांमध्ये अलमट्टी धरणावरुनही चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.