Breaking News

श्रीरामपूरमध्ये आ. कांबळे यांच्या विरोधात बॅनरबाजी

श्रीरामपूर
 काँग्रेसचे आ. भाऊसाहेब कांबळे नुकतेच शिवसेनेत दाखल झाले आहेत. परंतू जनमत त्यांच्यावर नाराज झाल्याचे चित्र आहे. कारण त्याच्याविरोधात श्रीरामपूरमध्ये ‘सत्तेसाठी ससाणे साहेब, विखे साहेब, थोरात यांना फसवणार्‍या गद्दार व बिनकामाच्या आमदाराला पाडायचे, असा मजकूर असलेले बॅनरबाजी करण्यात आली आहे. आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सगळ्या गटांचा विरोध आहे. विशेष म्हणजे कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने शिवसैनिकही नाराज आहेत.
  श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना सगळ्या गटांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ससाणे, विखे आणी नंतर थोरातांची साथ सोडणारे काँग्रेसचे आमदार आता शिवसेनेत दाखल आहे. मात्र, तिथेही त्यांना विरोध होताना दिसतोय. आज श्रीरामपूर शहरभर आमदाराला पाडायचंय अशा प्रकारचे अनेक बॅनर अज्ञात व्यक्तींनी लावले आहेत. आदिक, मुरकुटे ससाणे अशा दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ असलेला श्रीरामपूर मतदारसंघ 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि इथल्या राजकारणाला कलाटणी मिळाली. एक सामान्य दुकानदार जयंत ससाणे आणी विखे पाटील यांच्या साथीने श्रीरामपूरचा आमदार झाला. राजकारणाचा कोणताही गंध नसलेले भाऊसाहेब कांबळे जनसामान्यामधे मिसळून राहणारा माणूस म्हणून श्रीरामपूरच्या जनतेही त्यांना सतत साथ दिली. मात्र, भाऊसाहेब कांबळे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ससाणेंची साथ सोडत महाआघाडीत प्रवेश केला. तेव्हापासून ससाणे गट कांबळे यांच्यावर प्रचंड नाराज आहे. स्व.जयंत ससाणेंना खर्‍या अर्थाने कांबळेची साथ हवी असताना त्यांनी सोडलेला हात ससाणेंच्या जिव्हारी लागला होता. विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे यांना विखे पाटील यांनी यावेळी लोकसभेची काँग्रेसची उमेदवारीही दिली होती. मात्र, सुजय विखे यांच्या जागावाटपाच्या आणि भाजपा प्रवेशाच्या घडामोडीमुळे विखे पाटील यांनी कांबळे यांना थांबण्याचा सल्ला दिलेला असताना त्यांनी विखेंचे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा हात धरला आणी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवली. या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब कांबळे यांचा दारूण पराभव झाला. 
स्वतःच्या श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातही कांबळे आघाडी मिळवू शकले नाही. आता आपण काँग्रेसच्या तिकिटावर आमदार होणार नाही, अशी कांबळेची धारणा झाल्याने कदाचित त्यांनी शिवबंधन बांधले आहे. मात्र, शिवसैनिकही त्यांच्या मागे उभे रहायला तयार नाही आहे. अगोदरच ससाणे, विखेपाटील, बाळासाहेब थोरात यांची कांबळेवर नाराजी असताना शिवसैनिकही नाराज झाले आहे. त्यामुळे यावेळी आमदाराला पाडायचंच, अशा प्रकारची बॅनरबाजी करून भाऊसाहेब कांबळे अज्ञात व्यक्तींनी इशारा दिला आहे.