Breaking News

हरतालिकाचे विसर्जन करताना दोन महिलांसह चौघे बुडाले

वर्धा
हिंगणघाट येथे हरतालिका विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिलांसह चारजण नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. बुडालेल्यांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जणांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. आज दुपारी ही दुर्घटना घडली.
हिंगणघाट येथे वणा नदीत हरतालिका विसर्जन करताना दोन महिला आणि दोन लहानग्यांचा तोल गेल्याने हे चौघेही नदीत बुडाले. त्यामुळे नदीवर आलेल्या इतर महिलांनी जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी बोलवल्यानंतर नदीत बुडालेल्या चौघांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. या वेळी एका महिलेचा मृतदेह नदीतून काढण्यात पोलिसांना यश आले; मात्र आणखी एक महिला आणि दोन लहानग्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान, नदीत चारजण बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक आमदारांनीही घटनास्थळी धाव घेतली असून एनडीआरएफच्या टीमशी संपर्क साधण्यात आला आहे.