Breaking News

कचरा संकलनाची नियमबाह्य निविदा रद्द करावी

अहमदनगर/प्रतिनिधी
“शहरातील कचरा संकलन करुन वाहतूक करण्याची नियमबाह्य निविदा काढली जात असल्याचा आरोप करीत ही निविदा रद्द करावी’’, अशी मागणी नगरसेवक आसीफ सुलतान यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महापालिकेमार्फत ई-निविदा क्रमांक 2124, दि.26 ऑगस्टला संपूर्ण शहरातील कचरा गोळा करून कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याबाबत ठेकेदारांची नियुक्ती करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या निविदेच्या अटींमध्ये 3.3 मधील ‘ईव्युलेशन ईफ बाईडस’नुसार ठेकेदारास देय रक्कम ही प्रति मेट्रिक टन अदा करण्यात येणार असून त्यामुळे ठेकेदारास प्रति मेट्रिक टन ई-निविदेमध्ये सादर करावे असे नमूद आहे. हा घनकचरा संकलन वाहतुकीचे काम प्रति मेट्रिक टन वजनावर देणे शासन निर्णयानुसार नियमबाह्य आहे. तसेच महापालिकेमार्फत अद्याप सावेडी व बुरुडगाव कचरा डेपो येथे वजन काट्याची सुविधा नाही. त्यामुळे देयक अदा करताना भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शासन निर्णयानुसार पान क्रमांक 9 वर कंत्राटदारांना मोबदला या 28 क्रमांकाच्या मुद्यांमध्ये कंत्राटदारांना घ्यावयाचे पैसे दर टनावर आधारित नसावेत, असे केल्यास वर्गीकरणाद्वारे कचर्‍याचे प्रमाण कमी करण्यासाठी चालकाला काहीच प्रोत्साहन मिळत नाही. उलट या पद्धतीत वर्गीकृत कचरा देण्यास आणि अगदी डेबी वगैरे आणून अधिक पैसे मिळवण्यास प्रोत्साहन मिळते. म्हणून ठराविक विशिष्ट कामांसाठी ठराविक रक्कम चुकती करणे व सोबत दैनंदिन देखरेखीची प्रभावी प्रणाली असावी अशी नोंद आहे. वरीलप्रमाणे कचरा संकलनासाठी निविदा प्रक्रिया राबविल्यास महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील कचरा संकलन करुन वाहतूक करण्याची नियमबाह्य निविदा रद्द करुन, नव्याने निविदेबाबत नियोजन करून शहर कचरा हलविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी नगरसेवक आसीफ सुलतान यांनी केली आहे. अन्यथा या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.