Breaking News

विद्यार्थ्याने का केला शिक्षिकेचा खून?; पोलीस चक्रावले

मुंबई
गोवंडीतील सुफी इंग्रजी शाळेची शिक्षिका आएशा असलम हुसिया (30) हिच्यावर कादर नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपण हल्ला केला असे शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला करणार्‍या 13 वर्षीय आरोपी विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितल्याने आयशा खून प्रकरणाच्या तपासाला वळण मिळाले आहे. विद्यार्थ्याच्या हल्ल्यात शिक्षिका आयशा हुसिया यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गोवंडी येथे घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे. पोलिसांनी या विद्यार्थ्याला बाल न्याय मंडळापुढे (जेजेबी) हजर केल्यानंतर त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
या विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याची सूचना देणारी कादर नावाची व्यक्ती अस्तित्त्वात आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. या विद्यार्थ्याच्या पालकांच्या फोनवरच कादर नावाच्या व्यक्तीने विद्यार्थ्याला ही सूचना दिल्याचे त्याने जबाबात सांगितल्याने पोलीस त्याच्या पालकांच्या मोबाईलचीही तपासणी करणार आहेत. या विद्यार्थ्याने मंगळवारी मात्र पोलिसांना वेगळीच माहिती दिली होती. आपल्या आईकडून घेतलेले 2000 रुपये परत न दिल्याने आपण शिक्षिकेवर हल्ला केल्याचे या विद्यार्थ्याने पोलिसांना सुरुवातीला सांगितले होते. त्यानंतर गृहपाठ पूर्ण न केल्याने या शिक्षिकेने आपल्याला मारले होते आणि याचा राग काढण्यासाठी आपण शिक्षिकेवर हल्ला केला, असेही या विद्यार्थ्याने पुढील जबाबात सांगितले होते. दोन वेगवेगळ्या जबाबांनंतर या विद्यार्थ्याने कादर नावाच्या व्यक्तीने आपल्याला या शिक्षिकेवर हल्ला करण्याची किंवा गटारात फेकून देण्याची धमकी देण्याची सूचना केल्याचे पोलिसांना सांगितले. या विद्यार्थ्याने वेगवेगळे जबाब दिल्याने या प्रकरणात नेमके सत्य काय आहे हे तपासण्याचे काम करत आम्ही करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा मालमत्तेच्या वादाशी काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. काही वर्षांपूर्वी शिक्षिका आयशा यांच्या वडिलांचाही खून झाला होता. त्या प्रकरणाशी ही घटना संबंधित आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. असलम हे आयशा एज्युकेशन ट्रस्टची सुफी इंग्रजी शाळा चालवत असत. वडिलांच्या मृत्यूनंतर घटस्फोटीत असलेल्या आयशा या शिकवणी वर्गाबरोबरच ही शाळा चालवत असत.