Breaking News

मुंबई, कोकणात कोसळधारा

*1300 जणांना सुरक्षित स्थळी हलविले * महाड पाण्यात* मुंबईच्या जीवनवाहिन्या ठप्प* पनवेलमध्ये आपत्ती निवारण पथक

मुंबई, पुणे / प्रतिनिधी
  मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलं आहे. मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कुर्ला पश्‍चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेले असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे. आतापर्यंत 1300 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. कोकणात महाडमध्ये पाणी घुसले आहे. पनवेलमध्येही आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. मुंबईच्या लोकल सेवेला जीवनवाहिन्या म्हटले जाते, त्या ठप्प झाल्या आहेत. 
कुर्ला पश्‍चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांतीनगर पुन्हा पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर नदीचे पाणी वस्तीत घुसण्याची शक्यता असून, मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. मुंबई महापालिका आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक या भागात पोहोचले असून, बचावकार्य हाती घेतले आहे. रायगडमध्येही मुसळधार पाऊस सुरू असून, कुंडलिका, अंबा, सावित्री आणि पातळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुण्यातून राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची दोन पथके पनवेलमध्ये दाखल झाली आहेत. सतत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील ठाणे-मुंबई सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 
मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचले असून रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही मंदावली आहे. पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. पश्‍चिम आणि मध्य रेल्वेसहित हार्बर मार्गावरील वाहतूकही उशिराने सुरू आहे. मुसळधार पावासामुळे ठाणे, मुंबई आणि कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापुरातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. ही दरड हटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.

रोहा खिंड आणि ताम्हिणी घाटातील वाहतूक बंद
रोहा खिंडीत दरड कोसळल्याने नागोठणे रोहा दरम्यानची वाहतूक बंद झाली. ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने माणगाव-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भोर घाटही बंद असल्याने दक्षिण रायगडमधून पुण्याला जोडणारे दोन्ही मार्ग बंद झाले. मुरुड रोहा मार्गावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत आहे.

मराठी कलाकारांना फटका
गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. विविध ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका मराठी कलाकारांनाही बसला आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, अभिनेत्री तेजश्री प्रधान व अभिजीत खांडकेकर हे वाहतूक कोंडीत अडकले आहेत. पावसामुळे बरेच शूटिंग रद्द करण्यात आले आहेत.

आणखी तीन दिवस कोसळधारा
राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने येत्या आठ सप्टेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 48 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने इशारा दिला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

कोकण रेल्वेलाही फटका
रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. नागोठणे ते रोहा दरम्यान कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली. त्यात कोसळत असलेल्या पावसामुळे रुळावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. त्याचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.