Breaking News

देवदैठण ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना मदत

कोळगाव/प्रतिनिधी

श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सांगली जिल्ह्यातील भुवनेश्वर वाडी येथील पूरग्रस्त कुटुंबाना दैनंदिन वापरातील वस्तूंची मदत सुपूर्द केली.

 सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना राज्यातून मदतीचा ओघ सुरु आहे. यातच आपणही समाजाचे काही देणे लागतो या उक्ती प्रमाणे देवदैठण येथील शिवशक्ती प्रतिष्ठाण, वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, छत्रपती प्रतिष्ठाण, जाणता राजा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्थांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला देवदैठण ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत माणुसकीचे दर्शन घडविले. तरूणांनी घरो घरी जाऊन मिळेल ती मदत गोळा केली. यामधे धान्य, औषधे, कपडे, साबण, टूथपेस्ट, चिवडा, टूथब्रश, काडेपेटी, अगरबत्ती आदी प्रकारची एक पिकअप भरून मदत जमा केली.

 शिवराय लोखंडे, रवि कोकाटे, मनेश गव्हाणे, ऋषिकेश शिंदे, अजान शेख, राहुल ढवळे आदी तरुणांनी सांगली येथील धनगाव व भुवनेश्वर वाडीतील मदतीपासून वंचित असणाऱ्या १५० हून अधिक पूरग्रस्त कुटुंबाना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना औषधांसह दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचे वाटप केले.