Breaking News

गणरायाचे सर्वत्र धुमधडाक्यात स्वागत

अहमदनगर/प्रतिनिधी
 गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांची सकाळपासून तयारी सुरु होती. विविध मंडळांनी स्वागताच्या तयारीसाठी नियोजन केले होते. शहरातील विविध शाळा, गणेश मंदिरांमध्ये उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांसह गणेशभक्तांकडून गणेशोत्सवाचे साहित्य उत्साहात खरेदी केले जात होते. सजावटीचे साहित्य, दुर्वा, फुलांच्या जोडीपासून तांब्याचा कलशापर्यंत विविध साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची बाजारात गर्दी झाली होती. याशिवाय मंडपाची उभारणी करणे, आकर्षक विद्युत रोषणाई करणे, गणेश आगमन मिरवणुकीची तयारी करणे, यामध्ये बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्येकर्ते मग्न होते.
शहरातील गांधीमैदान व सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौक परिसर याशिवाय विविध ठिकाणी गणेश मूर्तीचे स्टॉल लागले होते. या स्टॉलवर रविवारी सायंकाळी मूर्तीची खरेदी करण्याची लगबग सुरू होती.
अनेक सार्वजनिक मंडळांनी बाप्पाच्या मूर्तीची बुकिंग करुन ठेवली असून सोमवारी वाजत-गाजत मिरवणूक काढून मूर्ती घेऊन जाण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे सोमवारी गणरायांचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले असल्याचे चित्र आहे.
विघ्नहर्त्या गणरायाची प्रतिष्ठापनेनिमित्त शहरातील चितळे रोड, दिल्लीगेट, माळीवाडा, नवीपेठ, गांधीमैदान यासह सावेडीतील प्रोफेसर कॉलनी परिसर, भिस्तबाग चौक, अशा विविध भागात पूजा साहित्य खरेदीचे स्टॉल लागले होते.  दिवसभर या स्टॉलवर घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍या गणेशभक्तांसह मंडळांच्या कार्यकर्त्यांची खरेदीसाठी गर्दी होती. विड्याची पाने, खारिक, खोबरे, हळकुंड, नारळ, जानवे, आदी साहित्याची खरेदी गणेशभक्ताकडून केली जात होती. घरगुती गणेशोत्सव साजरा करणार्‍यांकडून डेकोरेशन करण्यासाठी मखर, विविध प्रकारचे हार, लायटिंगच्या माळा, असे विविध साहित्य खरेदी करण्यात येत होते.