Breaking News

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

मुंबई / प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दाखविली असताना मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहील, असा दावा केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणारच असल्याचे फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केले. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली, तरीही या सत्ताधारी पक्षांमध्ये अजूनही जागावाटपावर अंतिम चर्चा झालेली नाही. अशात युती तुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे; परंतु मुख्यमंत्र्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भातील घोषणा केली जाईल. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यास काहीच हरकत नाही; परंतु मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहील असे त्यांनी सांगितले.

शरद पवार युगाचा अंत झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. पवारांची पिढी आता राहिलेली नाही. पवार यांनी राजकीय पक्षांची मोड-तोड केली. कालचक्र पाहा, आता त्यांच्यासोबत तसेच होत आहे, असे ते म्हणाले. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभर कौतुक केले. मोदींनी देशातील जनतेच्या मनात एक विश्‍वास जागृत केला आहे, असे ते म्हणाले.

162, 126 च्या फॉर्म्युल्याचे वृत्त चुकीचे
राज्यातील 288 जागांपैकी भाजप 162 आणि शिवसेना 126 जागांवर लढणार आहे,  असे वृत्त समोर आले होते. भाजपने पाठविलेला जागावाटपाच्या फॉर्म्युल्याला शिवसेनेचीही संमती आहे, असे या वृत्तात म्हटले होते; परंतु मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले.