Breaking News

पदरी पडलं पवित्र केलं!

राजकीय पक्षांना गुन्हेगारीचे वावडे नाही. कोणताही राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही. गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे, गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचे प्रमाण कमी जास्त असते, इतकेच. इतरांपेक्षा वेगळा असल्याचा आव आणीत असलेला भाजपही आता त्यात फारच पुढे गेला आहे. विरोधकांचे खच्चीकरण करणे ठीक; परंतु त्यासाठी लोकशाही मार्ग आहेत. ते न वापरता आमदारांची घाऊक पक्षांतरे, त्यांची खरेदी विक्री, आमदार, नेते, खासदार फोडण्याच धन्यता मानली जात आहे. गोवा, कर्नाटक, मणिपूर, मेघालयासह अन्य राज्यांत जे घडले, ते सारेच लोकशाही संमत मार्गाने होते असे नाही. आता महाराष्ट्रात जे चालले आहे, ते पाहिले, तर भारतीय जनता पक्षाने नेत्यांच्या शुद्धीकरणाचा कारखानाच उघडला आहे, असे वाटावे, अशी स्थिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना-भाजपत जाणार्‍यांची रीघ लागली आहे. दोन्ही काँग्रेसकडून निवडून येण्याची शक्यता कमी असणे, साधन सामुग्रीचा अभाव, विरोधकांत असताना विकासकामे करून घेण्यावरील मर्यादा, सहकारी व अन्य संस्थांत केलेल्या घोटाळ्यांना संरक्षण, सक्त वसुली संचालनालय, प्राप्तिकर खात्याचा ससेमिरा चुकवणे अशा अनेक कारणांमुळे शिवसेना आणि भाजपत जाण्यासाठी रांग लागली आहे. साधनशूचितेचा आव आणणारा भाजपही आता काँग्रेसमय झाला आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याऐवजी काँग्रेसयुक्त भाजप होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सांगितले, की भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, येणार्‍यांना उमेदवारी देण्याचे प्रमाण दोन टक्के असेल, तरी ज्या प्रतिक्रिया भाजपच्याच नेत्यांकडून येत आहेत, त्या पाहिल्या, तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जी भीती वाटते आहे, ती रास्त आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांनी तर इतक्याही लोकांना प्रवेश देऊ नका, की ज्यामुळे आम्हालाच जागा राहणार नाही, असे वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला सत्ता मिळण्याची जास्त शक्यता असताना हे दोन पक्ष फोडाफोडीची स्पर्धा का करीत आहेत, हेच कळत नाही.

आतापर्यंत ज्यांना गुन्हेगार म्हणून हिणवले, ज्यांच्यावर अनेक आरोप केले, ज्यांच्या चौकशा झाल्या, जे अनेक दिवस तुरुंगात राहून आले, ज्यांच्या शेजारी बसले, तरी आपल्या चारित्र्यावर ढब्बा येईल, असे ज्यांना वाटत होते, त्यांनीच अशा कथित भ्रष्ट लोकांना आता कडेवर घ्यायचे ठरविले असेल आणि त्यासाठी गुजरातची निरमा वॉशिंग पावडर असल्याचे समर्थन केले जात असेल, तर बोलायलाच नको. प्रवेश करणार्‍या काहींवरचे गुन्हे तर अजूनही न्यायप्रविष्ठ आहेत, तरीही त्यांना पवित्र करून घेतले जात आहे. विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्यातून यशस्वी होईलही; परंतु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात, त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या वाटयाला बदनामी येईल, त्याचे काय, हा प्रश्‍न उरतोच. अर्थात अगोदरही अनेक आरोप असलेले, गुन्हे असलेले लोक भारतीय जनता पक्षात आहेत. एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात तर सर्वाधिक गुन्हे असलेल्या उमेदवारांत आणि खासदार, आमदारांतही भारतीय जनता पक्षाचा पहिला क्रमांक होता. जास्त आमदार, खासदार असल्यामुळे तसे झाले असे नाही, तर टक्केवारीतही भाजपने समाजवादी पक्षासह सर्वांना मागे टाकले आहे. आता ती टक्केवारी भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीचे आरोप असलेल्यांना प्रवेश दिल्याने  आणखी वाढेल, इतकेच. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना भाजपने प्रवेश देणे योग्य नाही. कलंकितांच्या प्रवेशामुळे या पक्षाला बदनामीचा धोका आहे, असा इशारा हजारे यांनी दिला आहे. भाजपमध्ये सध्या मोठया प्रमाणात महाभरती सुरू आहे. उस्मानाबाद सहकारी बँक, तेरणा सहकारी साखर कारखाना गैरव्यवहारातील आरोपी पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षांतील अनेक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर  हजारे यांनी सध्याच्या घाऊक पक्षांतराबाबत भाष्य केले आहे. ‘राजकारणात भ्रष्ट नेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे नेते आपल्या भ्रष्टाचार आणि गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी नेहमीच सत्तेच्या वळचणीला जातात. आपले गैरव्यवहार झाकण्यासाठी नेहमीच सत्तेच्या आश्रयाला जाणारे माजी मंत्री सुरेश जैन हे याचे उत्तम उदाहरण आहे. आपले कोटयवधी रुपयांचे गैरव्यवहार झाकण्यासाठी जैन यांनी तीनदा पक्षांतर केले. त्यामुळे घरकुल घोटाळ्यात त्यांच्यावरील कारवाईला मोठा विलंब झाला’, असे हजारे म्हणाले. ‘सत्तेच्या आश्रयाने राजकारणातील गुन्हेगारी फोफावली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेले भ्रष्ट, गुन्हेगार राजकारणी अस्वस्थ आहेत. आपल्यावरील गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याची त्यांची धडपड सुरू आहे. त्यातूनच सत्ताधारी पक्षांत प्रवेश होत आहेत. भाजपने अशा नेत्यांना प्रवेश देणे योग्य नाही. कलंकितांना पक्षप्रवेश देण्याचे सत्र असेच कायम राहिले तर पक्ष बदनाम होण्यास वेळ लागणार नाही’, असा इशारा हजारे यांनी भाजपला दिला आहे. अर्थात हा इशारा भाजप मानणार नाही, हा भाग वेगळा.

गुन्हेगार आणि भ्रष्ट व्यक्तींना सत्ताधारी किंवा कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिल्यास मतदारांनी त्यांना धडा शिकवावा, असे आवाहन हजारे यांनी केले आहे. देशात नवमतदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासह सर्वच मतदारांनी विचारपूर्वक चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक, समाजहिताचे काम करणार्‍या उमेदवारांना निवडून द्यावे. कोणत्याही पक्षातील अशा उमेदवारांना निवडून दिल्यास देशात लोकशाही बळकट होईल, असा आशावाद हजारे यांनी व्यक्त केला असला, तरी तो आदर्श आशावाद आहे. निवडणुकीत साम, दाम, दंड भेदाबरोबरच विकासाचे राजकारण करण्याऐवजी भावनिक राजकारण करणार्‍यांना जनता निवडून देते, हे हजारे यांच्यासारख्यांच्या लक्षात यायला हवे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपमध्ये सुरू असलेल्या या प्रवेशावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ‘सत्ता बदलली की लोक पण बदलतात, हे बरोबर नाही; मात्र अशावेळी थोडा संयम ठेवला पाहीजे. जहाज बुडाल्यावर जसे उंदीर पळतात, तसे लोक दुसर्‍या पक्षात पळतात; मात्र असे लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत, असा टोला गडकरी यांनी लगावला आहे. राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही समस्या आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ही भाजपमध्ये होत असलेल्या पक्ष प्रवेशावर आपल्याच नेत्यांना घरचा अहेर दिला आहे. सध्या भाजपमध्ये इतर पक्षातल्या नेत्यांची प्रवेशासाठी रांग लागली आहे. त्याला मेगाभरती असेही म्हटले जाते. त्यावरच खडसे यांनी टोलेबाजी केली आहे. भाजपमध्ये येणारे सगळेच नेते हे काही साधू, संत नाहीत. प्रत्येकाला काहीतरी पाहिजे आहे. कुणी सत्तेच्या संरक्षणासाठी, कुणी पदासाठी तर कुणी अन्य कारणांसाठी भाजपमध्ये येत आहेत. राजकारणात हे घडतच असते; पण भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी प्रत्येकाची स्वच्छता केली जाते. मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर असून येणार्‍या लोकांना पवित्र केले जाते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख ही लक्षात घ्यायला हवा.