Breaking News

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची पाकिस्तानी वकिलाची कबुली

khawar Qureshi
इस्लामाबाद
काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाठिंबा न मिळणार्‍या पाकिस्तानला आता देशातील नामवंत व्यक्तींकडूनच खोटे ठरवले जात आहे. पाकिस्तानचे प्रतिष्ठित वकील खावर कुरेशी यांनी काश्मीर प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना पाकिस्तानला झटका दिला आहे. पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेमध्ये कुरेशी यांनी हे मान्य केले आहे, की काश्मीर प्रकरण ही भारताचा अंतर्गत बाब आहे. कुरेशी यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची बाजू मांडल्याने ते एक बडे आणि नामवंत वकील मानले जातात.

टीव्हीच्या चर्चेत बोलताना कुरेशी म्हणाले, की काश्मीरबाबत पाकिस्तानची बाजू कमजोर आहे. पाकिस्तानने जर आंतरराष्ट्रीय न्यायालयात काश्मिरातील कथित नरसंहाराचा मुद्दा मांडला, तर ते सिद्ध करणे मोठे कठीण काम आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या स्थापनेनंतर एकाही देशाविरोधात नरसंहाराचा खटला सिद्ध झालेला नाही. त्यांनी पुढे म्हटले आहे, की घरगुती स्तरावर पाकिस्तानचे लोक काश्मीरचा मुद्दा चांगल्या प्रकारे जाणतात; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा अधिक स्पष्ट होत नाही. भारत आणि पाकिस्तानच्या बाहेरच्या लोकांना काश्मिरात काय चालले आहे, यावर वेगळा दृष्टिकोन असू शकतो; मात्र मी काश्मीरला भारताचा अविभाज्य घटकाच्या रुपात पाहतो.

काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांमध्ये चर्चा घडवून आणण्यास पाकिस्तान अपयशी ठरला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र इथेही पाकिस्तानला झटका बसू शकतो. कारण कोणत्याही देशाने यांपैकी काही मुस्लिम राष्ट्रांनीही पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन केलेले नाही.