Breaking News

चीन सीमेवर भारत प्रथमच करणार मोठा युद्धाभ्यास

नवीदिल्ली
भारतीय लष्कराकडून वायुसेनेबरोबर चीनच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यात मोठा युद्धाभ्यास केला जाणार आहे. भारतीय सेनेच्या एकमेव ‘17-माउंटन स्ट्राइक कोर’चे पाच हजार जवान अरुणाचल प्रदेशात होणार्‍या या मोठ्या प्रमाणावरील युद्धाभ्यासात सहभागी होणार आहेत. चीनच्या सीमेवर भारतीय सेनेचा हा पहिलाच युद्धाभ्यास असणार आहे. या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जवानांना तैनात केले जाणार आहे.

यासाठी नवनिर्मित ‘17 - माउंटन स्ट्राइक कोर’ कडून पाच ते सहा महिन्यांपासून ईस्टर्न कमांड अंतर्गत तयारी केली जात आहे. युद्धाभ्यासात तेजपूरमधील चार कोर तुकड्यांना सेनेच्या रक्षणासाठी एका अतिउच्च ठिकाणी तैनात केले जाणार आहे. यामध्ये ‘17 - माउंटन स्ट्राइक कोर’ च्या अडीच हजारपेक्षा जास्त जवानांना वायुसेना युद्धाभ्यासासाठी एअरलिफ्ट करणार आहे. या युद्धाभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान, 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ला करणार आहेत. या युद्धाभ्यासासाठी वायुसेना पश्‍चिम बंगालमधील बगदोगरा येथून सैनिकांना एअरलिफ्ट करणार आहे. यासाठी वायुसेना सी-17 ग्लोबमास्टर, सी-130 जे सुपर हरक्युलिस आणि एएन-32 या विमानांचा वापर करणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर युद्ध क्षेत्राच्या ठिकाणी सैन्य तैनात करता येणार आहे.

याशिवाय या युद्धाभ्यासात ‘17 - माउंटन स्ट्राइक कोर’ च्या हॉवित्झर तोफांबरोबर रणगाडे आणि लष्कराच्या लढाऊ तुकड्यांचा शस्त्रसज्जतेसह समावेश असणार आहे. या युद्धाभ्यासाचे आयोजन चीनबरोबर पर्वतीय क्षेत्रात युद्धासाठी ‘17 माउंटन स्ट्राइक कोर’ ला अधिक सक्षम बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.