Breaking News

खेळाडूंना चालना देण्यासाठी संघटना प्रयत्नशील

अहमदनगर/प्रतिनिधी
 “जिल्ह्यातून अनेक उत्कृष्ट खेळाडूंनी बुध्दीबळ खेळात नाव गाजवले आहे. खेळाडूंचा चालना देण्यासाठी नगर जिल्हा बुद्धिबळ संघटना नेहमीच प्रयत्नशील असते. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या वतीने खेळाडूंसाठी ग्रॅण्ड मास्टर कोचिंग कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असून, यामध्ये ग्रॅण्ड मास्टर स्वप्निल धोपाडे याचे दोन दिवसासाठी खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे’’ असे प्रतिपादन नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
येथील बुध्दीबळ खेळाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रासह जागतिक पातळीवर नेणार्‍या बुद्धीबळ खेळाडूंचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बुलडाणा जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सचिव अंकुश रक्ताटे, सचिव यशवंत बापट, विश्‍वस्त पारुनाथ ढोकळे, अण्णासाहेब गागरे, प्रशिक्षक प्रकाश गुजराती, डॉ. स्मिता वाघ, संजय पांढरकर, सुमंगल गागरे,  मच्छिंद्र इंगळे आदींसह पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत पारुनाथ ढोकळे यांनी केले. प्रास्ताविकात बुद्धीबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी “खेळाडूंना प्रोत्साहन देणे व त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करणे हे संघटनेचे कार्य आहे. गुणवंत खेळाडूंना पाठीवर शाबसकीची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे’’ असे सांगितले. अंकुश रक्ताटे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रॅण्ड मास्टर शार्दुल गागरे, शाल्मली गागरे, फिडे मास्टर सुयोग वाघ, अखिलेश नगरे, शशांक धगधगे, प्रणीत कोठारी, हर्ष घाडगे, ईश्‍वरी वाखारे, वेदांती इंगळे, चैतन्य पांढरकर, प्रज्वल आव्हाड, हर्षद मखरे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.