Breaking News

सुरेशदादा इज चक्की पिसिंग अँड पिसिंग!

जळगाव / प्रतिनिधी
जळगाव नगरपालिकेतील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळे विशेष न्यायालयात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन यांना सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि सुमारे शंभर कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यानंतर जैन यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. ‘सुरेशदादा इज चक्की पिसिंग अँड पिसिंग’, अशा शब्दात खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जैन यांच्या घरकुल घोटाळ्यासंदर्भात 20 ते 25 वर्षांपासून आपण विधानसभा व विधानसभेबाहेर आवाज उठवला. माझ्यासह दिवंगत नरेंद्र पाटील आणि इतर अधिकार्‍यांनी हा सामूहिक लढा दिल्याचे सांगून खडसे म्हणाले, की जैन यांनी वेळोवेळी हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कायम पक्षबदल केला. सत्तेत असलेल्या पक्षात प्रवेश केला; मात्र शेवटी या लढ्याला यश आले. अखेर सत्याचा विजय झाला. जैन आणि सहकारी हे एक दिवस जेलमध्ये जातील आणि चक्की पिसतील, असे वक्तव्य आपण त्याचवेळी केले होते. आज तो त्यांचा चक्की पिसण्याचा दिवस आला आहे.
धुळे न्यायालयाने घरकुल घोटाळ्याप्रकरणी मोठा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरसेवकांना 183 कोटीचा जबर दंड ठोठावण्यात आलेला आहे. भष्टाचार्‍यांना धाक वाटावा, असा हा निकाल असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.