Breaking News

आरेतील वृक्षतोडीविरोधात मानवी साखळी


मुंबई
 मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरे वसाहतीतील अडीच हजार झाडे काढण्याच्या वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात रविवारी पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी आंदोलन केले. भर पावसात 3 किमीपर्यंत ही मानवी साखळी तयार करण्यात आली होती. आरे वाचवा असे आवाहन करणारी  घोषवाक्ये लिहिलेले फलक या वेळी आंदोलनकर्त्यांनी झळकवले.
कारशेडसाठी 2646 झाडे काढण्याचा प्रस्ताव नुकताच वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीत मंजूर झाला. त्यामुळे कारशेडचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीला सर्व पातळ्यांवरून विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणप्रेमींनी एका बाजूला या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. तर रविवारी सुमारे दीड हजार नागरिकांनी मानवी साखळी आंदोलनात सहभाग घेतला होता. मेट्रो कारशेडसाठी उभारलेल्या बॅरिकेड्सच्या अवतीभोवती ही साखळी तयार करण्यात आली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील आंदोलनात सहभागी झाली होती. प्रश्‍न 2700  झाडांचा नाही तर संपूर्ण जंगलाचा आहे, या कारशेडमुळे संपूर्ण जंगल उद्ध्वस्त होणार आहे, अशी प्रतिक्रिया  एका कार्यकर्त्यांने दिली.
वृक्ष प्राधिकरणने मंजूर केलेला हा प्रस्ताव मागे घेऊन पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
ट्विटरवरून वृक्षतोडीला विरोध करणार्‍या राजकारण्यांनी रस्त्यावर उतरून जंगलासाठी लढा द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केवळ समाजमाध्यमांवरून विरोध करण्यापेक्षा झाडे वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा, अशीही प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.