Breaking News

वननिवासीची माहिती अद्ययावत करावी

अहमदनगर/प्रतिनिधी
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006, नियम 2008 व सुधारणा नियम 2012 च्या अंमलबजावणी अंतर्गत वैयक्तिक वनहक्क पात्र झालेल्या वनहक्क लाभार्थ्याची माहिती राज्यस्तरीय समितीच्या ऑनलाईन पोर्टलवर भरण्यात आलेली आहे. या कायद्यांतर्गत पात्र झालेल्या वनहक्क लाभार्थ्यांना नियम 16 नुसार बँकांकडून कर्ज तसेच इतर शासकीय सवलतींचा फायदा देण्यात येणार आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे आयुक्ताने वनहक्काची माहिती दि.20 जुलैपर्यत अद्ययावत करण्याच्या सूचना संबंधित विभागास  दिल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक वनहक्क पात्र झालेल्या लाभार्थ्यांनी त्यांच्याकडील  वनहक्क पट्टा, आधारकार्ड, बँक पासबुकचे पहिले पान, पॅनकार्ड या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती व मोबाईल क्रमांक संबंधित तलाठी कार्यालयाकडे दि.19 जुलैपर्यत  जमा करावेत. तलाठी यांनी लाभार्थ्याची  सर्व  कागदपत्रे  तत्काळ संबंधित तहसील कार्यालयात जमा करावीत. तहसीलदारांनी लाभार्थ्याची  माहिती दिनांक 03 सप्टेंबरपर्यत जिल्हाधिकारी कार्यालय (वनहक्क शाखा) यांच्याकडे जमा करण्यात यावी, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय वनहक्क समिती, नगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.