Breaking News

गौरींचे वरुणराजाच्या आगमनाने उत्साहात स्वागत

शहरटाकळी/प्रतिनिधी
 बाप्पाच्या आगमनानंतर महालक्ष्मीच्या रुपात येणार्‍या गौरींचे ग्रामीण भागात ठीक ठिकाणी वरुणराजाच्या झालेल्या आगमनासह उत्साहात स्वागत करण्यात आले.
 प्रत्येक कुटुंबाच्या प्रथा आणि परंपरेप्रमाणे ज्येष्ठागौरीची प्रतिष्ठापना केली जाते. काही कुटुंबात सुपारी किंवा खडीच्या गौरी बसवल्या जातात. काही ठिकाणी शाडूच्या मूर्ती, कापडाच्या, फायबरच्या किंवा पंचधातू मुखवट्याच्या गौरी बसवल्या जातात. गौरी समोर जीण्यासारखी उतरंड करून त्यावर आरस मांडली जाते. काळानुरूप ही प्रथा परंपरा मागे पडत असताना देखील आजही ग्रामीण भागात गौरी पुढे सजावट करून आरस बनवली जाते. ही कला अवगत असलेली अनेक कुटुंबे आजही ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहेत. शहरटाकळी येथील बाबासाहेब राधाकिसन वसेकर हे गेल्या तीन पिढ्यांपासून गौरीपुढे आकर्षक आरसाची परंपरा जोपासत असून त्यांनी केलेल्या गौराई आरसाची आकर्षक अशी सजावट बघण्यासाठी परिसरातून गर्दी होत आहे. गौरींच्या आवाहनानंतर भाजी-भाकरीचा नैवेद्य आणि दुसर्‍या दिवशी पुरणपोळी सोळा भाज्यांचा साग्रसंगीत नैवेद्य दाखवून हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे.