Breaking News

वायुदलात दाखल झाले खतरनाक अपाची हेलिकॉप्टर

नवी दिल्ली
जगातील सर्वांत खतरनाक लढाऊ हेलिकॉप्टर अपाची भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. यामुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार असून शत्रूंना नक्कीच घाम फुटणार आहे. अपाची एएच-64 ई अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. जगातील सर्वांत घातक असे हे हेलिकॉप्टर मानले जाते.
भारतीय वायुदलाने अपाची हेलिकॉप्टसाठी अमेरिकी आणि बोईंग लिमिटेड सोबक सप्टेंबर 2015 मध्ये करार केला होता. त्यानंतर बोईंगने 27 जुलैला 22 पैकी चार हेलिकॉप्टर दिली. त्यानंतर आज आठ हेलिकॉप्टर पाठवण्यात आली आहेत. अपाची हे जगातील सर्वांत घातक असे हेलिकॉप्टर असल्याने पारंपरिक युद्धामध्ये त्याचा फायदा होईल. लपून बसलेल्या दहशदवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका पार पाडेल. अत्याधुनिक हत्यारे असलेले आणि जलद उड्डाण करणारे हे हेलिकॉप्टर जमिनीवर होणार्‍या सगळ्या हल्ल्यांना उत्तर देऊ शकते. मिलीमीटर वेव रडारमुळे शत्रू कोठे लपून बसले आहे, याची माहिती मिळेल. लेजर गाइडेड हेलफायर मिसाईल, हायड्रा-70 अँटी ऑर्मर रॉकेट आणि 30 मिमी गन हे हेलिकॉप्टर उद्धवस्त करू शकते.
हे हेलिकॉप्टर थर्मल इमेजिंग सेंसरचा वापर करून लपलेल्या दहशतवाद्यांनादेखील शोधू शकते. तसेच 30 एमएमच्या गनने ठारदेखील करू शकते. अपाची हेलिकॉप्टरने आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अमेरिकेने इराकच्या लष्करासोबत आणि अफगाणिस्तानमध्ये डोंगराळ भागात लपलेल्या तालिबानच्या दहशतवद्यांसोबत याच अपाची हेलिकॉप्टरचा वापर केला होता. बोईंगने जगभरात जवळपास 2200 अपाची हेलिकॉप्टर दिले आहेत. 2020 पर्यंत भारतीय वायुसेनेकडे 22 अपाची हेलिकॉप्टर असतील.

रात्रीही हल्ला करण्याची क्षमता
अपाची हेलिकॉप्टर कोणत्याही लष्करी कारवाईसाठी वापरता येणार आहे. रात्रीदेखील हे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकते. उच्च क्षमतेचे हे हेलिकॉप्टर दोन टर्बोशेफ्ट इंजिनपासून बनलेले आहे. अपाची 293 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने उडू शकते. अपाची एएच -64 ईमध्ये 30 एमएमची 230 ऑटोमॅटिक गन आहे. तिच्यामधून 1200 राउंड फायरिंग केले जाऊ शकतात.